औंढ्यात हरहर महादेवाचा गजर; नागनाथ चरणी भाविक लीन, मध्यरात्रीपासूनच भाविकांच्या रांगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 11:44 IST2025-02-26T11:43:36+5:302025-02-26T11:44:29+5:30

शासकीय महापूजे नंतर रात्री दोन वाजता मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले

Harhar Mahadeva's chanting in the Aundha; Devotees line up at Nagnath's feet, queues of devotees from midnight | औंढ्यात हरहर महादेवाचा गजर; नागनाथ चरणी भाविक लीन, मध्यरात्रीपासूनच भाविकांच्या रांगा

औंढ्यात हरहर महादेवाचा गजर; नागनाथ चरणी भाविक लीन, मध्यरात्रीपासूनच भाविकांच्या रांगा

- हबीब शेख
औंढा नागनाथ (हिंगोली ) :
देशातील आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ येथे महाशिवरात्रीनिमित्त मंगळवारी मध्यरात्री आमदार संतोष बांगर, जिल्हाधिकारी अभिनव गोयल व उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी भगवान शंकराची सपत्नीक दुग्धाभिषेक व महापूजा केली. त्यानंतर बुधवारी (दि. २६ ) पहाटे दोन वाजता मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. मंदिर परिसर मध्यरात्रीपासूनच हर हर महादेव, बम बम भोलेच्या गजराने परिसर दणाणून गेला होता. 

श्रीक्षेत्र औंढा नागनाथ संस्थांनचे अध्यक्ष तथा तहसीलदार हरीश गाडे यांच्या हस्ते ध्वज पूजन (दि. २४ ) करून येथील महाशिवरात्र यात्रा महोत्सवास सुरुवात झाली. महाशिवरात्री निमित्त आदल्या दिवशी मंगळवारपासूनच देशभरातून हजारो भाविक भगवान शंकराच्या दर्शनासाठी शहरात दाखल झाले आहेत. भगवान शिव आणि पार्वती यांच्या विवाहाचा दिवस असलेल्या महाशिवरात्री निमित्त २५ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री आमदार बांगर व जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते शासकीय महापूजा पार पडली. त्यानंतर आज पहाटे दोन वाजता मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. यावेळी हजारोच्या संख्येने दर्शन रांगेत उभ्या असलेल्या भाविकांनी केलेल्या शिवशंकराच्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाले होते. 

मंदिर प्रशासनाकडून भाविकांच्या सुलभदर्शनासाठी बॅरिकेट्स लाऊन साधे दर्शन व विशेष दर्शन पास अशी व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे भाविकांच्या इतर सोयी सुविधांसाठी विशेष उपाय योजना करण्यात आलेली असल्याची माहिती संस्थानचे अधीक्षक वैजनाथ पवार व्यवस्थापक सुरेंद्र डफळ यांनी दिली. तसेच आरोग्य विभाग, नगरपंचायत विभाग, महावितरण विभाग आदींना तत्पर ठेवण्यात आले असून रांगेत असलेल्या भाविकांना पिण्याचे पाणी व अल्पोपहार उपलब्ध करून देण्यात येत आहे.

भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. एक अप्पर पोलीस अधीक्षक, दोन उपभागीय पोलीस अधिकारी, पाच पोलीस निरीक्षक, १९ पोलिस अधिकारी, १४५ पोलिस कर्मचारी, ११० होमगार्ड यांच्यासह दोन राज्य राखीव बल, एक बीडीएस पथक आणि एक दंगल नियंत्रण पथक,  असा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. तर यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मंदिर परिसरासह शहरात सीसीटीव्ही कॅमेऱ्याची करडी नजर राहणार आहे.

Web Title: Harhar Mahadeva's chanting in the Aundha; Devotees line up at Nagnath's feet, queues of devotees from midnight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.