जिल्ह्यात लाखोंचा गुटखा; अन्न प्रशासन अधिकारी सुस्तच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:29 IST2021-04-18T04:29:02+5:302021-04-18T04:29:02+5:30

हिंगोली : जिल्हा पोलिसांनी लाखो रुपयांचा गुटख्याचा साठा जप्त करून कारवाईचा सपाटा लावला आहे. ही कारवाई अन्न प्रशासन विभागाने ...

Gutkha worth lakhs in the district; Food administration officer sluggish | जिल्ह्यात लाखोंचा गुटखा; अन्न प्रशासन अधिकारी सुस्तच

जिल्ह्यात लाखोंचा गुटखा; अन्न प्रशासन अधिकारी सुस्तच

हिंगोली : जिल्हा पोलिसांनी लाखो रुपयांचा गुटख्याचा साठा जप्त करून कारवाईचा सपाटा लावला आहे. ही कारवाई अन्न प्रशासन विभागाने करणे अपेक्षित असताना, या विभागातील अधिकारी मात्र परभणीहून गाडा हाकत आहेत. त्यामुळे गुटखा विक्रेत्यांचे फावत आहे.

जिल्ह्यात काही महिन्यांपासून गुटखा विक्रेते सक्रिय झाले आहेत. दररोज लाखो रुपयांचा गुटखा सर्रास विक्री केला जात आहे. साध्या पानटपरी, किराणा दुकानावरही सहज गुटखा मिळत आहे. शासनाने गुटखा विक्रीवर बंदी घातली असताना, जिल्ह्यात मात्र लाखो रुपयांचा गुटखा येत आहे. शेवटच्या विक्रेत्यापर्यंत गुटखा पोहोचती करण्यासाठी साखळीच असल्याचे दिसून येत आहे. अन्न प्रशासन विभागाने गुटखा विक्रेत्यावर कारवाई करणे अपेक्षित असताना, या विभागातील अधिकारी मात्र परभणीहून गाडा हाकत आहेत. मागील काही महिन्यांत या विभागाकडून एकाही गुटखा विक्रेत्यावर कारवाई झाल्याचे ऐकीवात नाही. त्यामुळेच गुटखा विक्रेत्यांचे फावत आहे. पोलिसांनीच अवैध धंद्याविरुद्ध कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. पोलिसांच्या कारवाईमुळेच गुटखा विक्रेत्यांवर थोडा वचक बसल्याचे पाहावयास मिळत आहे. ११ एप्रिल रोजी हिंगोली शहरातील तलाबकट्टा भागातून ३ लाख ३० हजार ७२० रुपयांचा गुटखा पकडून कारवाई केली. त्यानंतर, वसमत येथे आठ दिवसांत तीन कारवाया करण्यात आल्या. १६ एप्रिल रोजी जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई करीत, पोलिसांनी गुटख्यासह तब्बल ४३ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस लाखो रुपयांचा गुटखा पकडत असताना, अन्न प्रशासन विभागातील अधिकारी जिल्ह्यात साधे फिरकतही नसल्याने, त्यांच्या कारवाईवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. या संदर्भात परभणी येथील अन्न प्रशासन विभागाच्या कार्यालयातील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधला असता, संपर्क होऊ शकला नाही.

अन्नपदार्थ भेसळीकडेही दुर्लक्ष

जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अनेक अन्नपदार्थ विक्रेते भेसळयुक्त पदार्थ विक्री करण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही व्यापारी तर अन्न पदार्थांची चढ्या दराने विक्री करीत असल्याच्या तक्रारी येत आहेत. असे असतानाही अन्न प्रशासन विभागातील अधिकारी कोणतीही कारवाई करीत नसल्याचा आरोप होत आहे. हिंगोली जिल्ह्यात स्वतंत्र अन्न व औषध प्रशासन विभागाचे कार्यालय स्थापन करावे, अशी मागणीही होत आहे.

Web Title: Gutkha worth lakhs in the district; Food administration officer sluggish