वसमत शहरातील किराणा दुकानावर जीएसटी पथकाचा छापा; रात्री उशिरापर्यंत झाडाझडती
By विजय पाटील | Updated: August 12, 2023 15:21 IST2023-08-12T15:21:23+5:302023-08-12T15:21:43+5:30
रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरु होती, जीएसटी पथकाची माहिती देण्यास टाळाटाळ

वसमत शहरातील किराणा दुकानावर जीएसटी पथकाचा छापा; रात्री उशिरापर्यंत झाडाझडती
- इस्माईल जहागिरदार
वसमत (जि. हिंगोली): शहरातील बहर्जी शाळा परिसरात असलेल्या एका किराणा दुकानावर शुक्रवारच्या सायंकाळी जीएसटी पथकाने जीएसटी थकली असल्याने छापा टाकला. या छाप्यादरम्यान पथकाने पूर्ण दुकानाची चौकशी व खातेवह्यांची तपासणी केली. रात्री उशिरापर्यत जीएसटी पथक दुकानात तळ ठोकून होते.
वसमत शहरातील बहर्जी शाळा परिसरात असलेल्या बाहेती यांच्या किराणा दुकानावर ११ ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजेदरम्यान जीएसटी पथकाच्या दोन गाड्यामध्ये आलेल्या कर्मचाऱ्यांनी किराणा दुकानावर छापा मारला. यावेळी महत्वाची कागदपपत्रे ताब्यात घेत चौकशी सुरु केली होती. काही कर्मचाऱ्यांनी दुकानातील किराणा माल व साहित्यांची तपासणी केली. पथकाने यावेळी कोणालाही दुकानात प्रवेश दिला नाही. अचानक झालेल्या कारवाईमुळे दुसरे दुकानदार चक्रावून गेले. ही कारवाई होताच शहरातील काही बड्या दुकानदारांनी आपली दुकाने बंद करुन काढता पाय घेतला होता. ही कारवाई कशाची होत आहे याचा ताळमेळ काहीकाळ लागला नाही. जीएसटी पथकाची कारवाई असल्याचे कळताच अन्य दुकानदारांनी दुकाने बंद करण्यात समाधान मानले.
पथकाची माहिती देण्यास टाळटाळ...
शहरातील किराणा दुकानावर छापा टाकल्यानंतर कोणत्या विभागाचे पथक असल्याची माहिती नागरीक व प्रसिद्धी माध्यमाचे प्रतिनिधी गेले असता त्यांना माहिती देण्यास या पथकाने टाळाटाळ केली. शेवटी जीएसटी पथकाची कारवाई आहे. पूर्ण तपासणी झाल्याशिवाय माहिती देता येत नाही, असे एका अधिकाऱ्यांनी सांगितले.