१८.१८ कोटींचा टंचाई आराखडा मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 23:23 IST2017-12-07T23:23:23+5:302017-12-07T23:23:29+5:30
जानेवारी २0१८ ते जून २0१८ या कालावधीसाठीचा पाणीटंचाई आराखडा नुकताच मंजूर करण्यात आला. यामध्ये १८.१८ कोटी रुपयांच्या २३१९ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. यंदा अल्पपर्जन्यामुळे टंचाईच्या झळा मोठ्या प्रमाणात सोसाव्या लागतील, असे चित्र आहे.

१८.१८ कोटींचा टंचाई आराखडा मंजूर
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जानेवारी २0१८ ते जून २0१८ या कालावधीसाठीचा पाणीटंचाई आराखडा नुकताच मंजूर करण्यात आला. यामध्ये १८.१८ कोटी रुपयांच्या २३१९ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. यंदा अल्पपर्जन्यामुळे टंचाईच्या झळा मोठ्या प्रमाणात सोसाव्या लागतील, असे चित्र आहे.
हिंगोली जिल्ह्यात दरवर्षीच आरंभशूर अधिकारी मंडळी पाणीटंचाई आराखडा तयार करण्याची लगबग डिसेंबरच्याही अगोदरच दाखवायची. मात्र हा आराखडा मंजूर होण्यास जानेवारीच उजाडायचा. यंदा हा आराखडा वेळेत मंजूर तर झाला आहे. मात्र अंमलबजावणीही त्याच गतीने होणे अपेक्षित आहे. यंदा अल्पपर्जन्यामुळे टंचाईच्या झळा लवकर बसण्याची भीती आहे. शेवटच्या टप्प्यात झालेल्या पर्जन्यामुळे टंचाईचा काळ लांबला, हेही तेवढेच खरे.
जानेवारी ते मार्च या कालावधीत १३.0९ कोटींच्या १३८५ उपाययोजना प्रस्तावित केल्या आहेत. यात २८ गावे-वाडी तांड्यांना २८ तात्पुरत्या पूरक नळयोजनेचा प्रस्ताव आहे. तर १११ गावांतील नळयोजनेच्या दुरुस्तीचा ५.१३ कोटींचा प्रस्ताव आहे. तर ७५ हजारांची तीन विंधन विहिरींची दुरुस्ती प्रस्तावित केली आहे. ३४८ गावांत २.८१ कोटींच्या ५0३ नवीन विंधन विहिरींचा प्रस्तावही आराखड्यात आहे. ४३२ गावांसाठी ६७५ विहीर-बोअर अधिग्रहणासाठी २.४३ कोटी प्रस्तावित केले आहेत. तर विहिरींतील गाळ काढणे, खोलीकरण या कामांसाठी ६ गावांना १२ लाख प्रस्तावित केले आहेत. तर ५४ गावांसाठी ५९ टँकरला १.0८ कोटी प्रस्तावित केले आहेत.