जमीन नावे करून देण्यासाठी २० हजारांची लाच घेणारा ग्रामसेवक गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2020 19:58 IST2020-10-24T19:56:19+5:302020-10-24T19:58:39+5:30
सेनगाव तालुक्यातील कडोळी येथील एका शेतकऱ्याने घरकुलाच्या कामासाठी ग्रामसेवक पैसे मागत असल्याची लाच लुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केली होती.

जमीन नावे करून देण्यासाठी २० हजारांची लाच घेणारा ग्रामसेवक गजाआड
हिंगोली : सेनगाव पंचायत समितीमधून घरकुल मंजूर करून देण्यासाठी तसेच तक्रारदार यांच्या वडिलांच्या नावे असलेली जागा वारसाहक्काने नावे करून देण्यासाठी २० हजारांची लाच स्वीकारणाऱ्या कडोळी येथील ग्रामसेवकास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने २३ ऑक्टोबर रोजी रंगेहाथ पकडले. आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले असून, याप्रकरणी गुन्हा दाखलची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
सेनगाव तालुक्यातील कडोळी येथील एका शेतकऱ्याने घरकुलाच्या कामासाठी ग्रामसेवक पैसे मागत असल्याची लाच लुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केली होती. घरकुल मंजूर करून देण्यासाठी तसेच तक्रारदाराचे वडिलाचे नावे असलेली जागा वारसा हक्काने नावे करून देण्यासाठी सेनगाव पंचायत समितीतील वर्ग ३ चा कर्मचारी ग्रामसेवक बबन तुकाराम इंगोले (रा. प्रवीणनगर, अकोला रोड हिंगोली) याने २० हजारांची मागणी केली होती. परंतु पैसे देण्याची इच्छा नसल्याने शेतकऱ्याने याबाबत एसीबीत तक्रार केली. त्यानंतर एसीबीच्या पथकाने प्रथम १९ ऑक्टोबर रोजी तक्रारीची पडताळणी केली असता तथ्य आढळुन आले. त्यानंतर २३ ऑक्टोबर रोजी पथकाने सापळा कारवाई करून आरोपी ग्रामसेवक बबन इंगोले यास लाचेची २० हजारांची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडले. याप्रकरणी ग्रामसेवकाविरूद्ध गुन्हा दाखलची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक हनुमंत गायकवाड, पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, पोनि ममता अफूने आदींनी केली.