"सरकार सगेसोयरेवर ठोस निर्णय घेत नाही"; मराठा आरक्षणासाठी युवकाने संपवले जीवन
By विजय सरवदे | Updated: June 14, 2024 17:52 IST2024-06-14T17:51:29+5:302024-06-14T17:52:08+5:30
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हिंगोली जिल्ह्यातील युवकाने उचलले टोकाचे पाऊल

"सरकार सगेसोयरेवर ठोस निर्णय घेत नाही"; मराठा आरक्षणासाठी युवकाने संपवले जीवन
हिंगोली: मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी वसमत तालुक्यातील कुरुंदा येथे एका युवकाने राहत्या घरी गुरुवारी मध्यरात्रीच्या वेळेस गळाफास घेऊन आत्महत्या केली. मराठा समाजाला आरक्षण द्यावे, याकरीता मी आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी मयताच्या खिशात सापडली असल्याचे पोलिसांनी सांगितले. सदर घटनेची माहिती मिळताच कुरुंदा पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली.
कुरुंदा येथील गजानन पुरभाजी इंगोले (वय ३५) या युवकाने १३ जून रोजी मध्यरात्री गळाफास घेऊन आत्महत्या केली. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, सगेसोयरेची अंमलबजावणी सरकार करीत नाही. त्यामुळे मी जीवन संपवित असल्याचे सापडलेल्या चिठ्ठीत नमूद करण्यात आले आहे. घटनास्थळी कुरुंदा पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला आहे. यानंतर कुरुंदा येथील आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी सहायक सहायक पोलिस निरीक्षक रामदास निरदोडे, बीट जमादार बालाजी जोगदंड, प्रदीप साळुंखे आदींची उपस्थिती होती. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी नोंद करणे सुरु होते.