घिसडी समाजाचे ऐरणीच्या देवाला साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:31 IST2021-05-07T04:31:08+5:302021-05-07T04:31:08+5:30
हिंगोली : वर्षाचे ३६५ दिवस १० किलोचा घन उचलून लोखंडाचे पाणी करावे तेव्हाच लेकरांबाळांच्या पोटापुरते अन्न मिळते. पण कोरोनामुळे ...

घिसडी समाजाचे ऐरणीच्या देवाला साकडे
हिंगोली : वर्षाचे ३६५ दिवस १० किलोचा घन उचलून लोखंडाचे पाणी करावे तेव्हाच लेकरांबाळांच्या पोटापुरते अन्न मिळते. पण कोरोनामुळे लागू केलेल्या संचारबंदीमुळे तेही पदरात पडत नाही. ‘कोरोना महामारी लवकर जाऊ दे अन् लेकराबाळांना भाकरकुटका मिळू दे’ असे म्हणत घिसडी समाजाने ऐरणीच्या देवाला साकडे घातले आहे.
वर्षाचे ३६५ दिवस लोखंडाचे पाणी करावे लागते. तरच घरात कोरकुटका खायला मिळतो अन् कुटुंबाचा गाडा चालतो. गोडधोड तर आमच्या नशिबातच नाही. कोरोनाआधी दिवसाकाठी कसेतरी १०० रुपये मिळायचे. तेही कोरोनाने हिसकावून घेतले आहेत. आजमितीस ५० ते ६० रुपये दिवसाकाठी मिळत आहेत. पिढ्यानपिढ्या हा व्यवसाय चालत आल्यामुळे दुसरा व्यवसायही करता येत नाही. ऐरणीच्या देवाने ७० वर्षांमध्ये आजपर्यंत कधी उपाशी ठेवले नाही. मग आताच का असा अंत पाहतो आहे, असा प्रश्नही या समाजाने ऐरणीच्या देवाला विचारला आहे.
१० किलोचा घन उचलून लोखंडावर मारून त्याला आकार देणे हे मोठे काम आहे. जोखीम पत्करून हे काम करावे लागते. थोडी नजर चुकली की सहकऱ्याला दुखापत होण्याची शक्यता असते. मागच्यावर्षी शासनाने थोडीबहुत मदत केली होती. परंतु, यावर्षी शासनाने काहीही मदत केली नाही, असेही या समाजाने सांगितले.
घिसडी समाजाची नाही म्हटली तरी जिल्ह्यात दहा ते बारा कुटुंबे हाच व्यवसाय करतात. हिंगोली शहरात सहा ते सात कुटुंबेही लोखंडाचे पाणी करून उपजीविका भागवितात. बाहेर पडावे तर जाता येत नाही, घरात बसावे तर अन्न मिळत नाही, अशा दुहेरी संकटात समाज सापडला आहे. लोखंड गरम करण्यासाठी कोळसा लागतो. परंतु, महागाईने कळस गाठल्याने तोही वेळेवर मिळत नाही. कधी-कधी अगठी बंद ठेवावी लागते. कोळसा नाही मिळाला तर काडीकचरा आणून अगठी पेटविली जाते. आता शासनाने एक दिवसाआड कामाला परवानगी दिली असली तरी अकरा वाजेपर्यंतच काम उरकून घ्यावे असेही सांगितले आहे. मोठी माणसे उपाशी राहू शकतात. लेकरे उपाशी राहू शकत नाहीत. तेव्हा शासनाने घिसडी समाजाचा विचार करून अन्नधान्य पदरात टाकावे, अशी विनंतीही केली आहे.
उन्हाळ्याचे दिवसही हातचे जात आहेत....
फेब्रुवारी महिन्यापासून शेतीची कामे सुरू होतात. जिल्ह्यातील शेतकरी खुरपे, नांगर, लोखंडी शिवळा, लोखंडी जू, कुणी, विळा आदी शेती विषयक औजारे घेऊन येतात. यातून पोटापुरता पैसा पदरात पडतो. परंतु, कोरोनामुळे संचारबंदी लागू केल्यामुळे शेतकरीवर्गही येत नाही. त्यामुळे हाही हंगाम हातचा जातो की काय, अशी भीती वाटत आहे. शासनाने घिसडी समाजाचा विचार करून एकवेळचे अन्नतरी द्यावे, अशी मागणी रंगनाथ सोळंके, संतोष सोळंके, राम शिंदे यांनी केली आहे.
फोटो १०