बाईकवरून जिलेटिनची वाहतूक; दोन जण ताब्यात, ८३ कांड्या जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2022 17:08 IST2022-03-05T17:08:33+5:302022-03-05T17:08:43+5:30
बाईकवरून जाणाऱ्या दोघांना पोलिसांनी अडवले असता त्यांच्याकडून जिलेटीनचा साठा जप्त केला.

बाईकवरून जिलेटिनची वाहतूक; दोन जण ताब्यात, ८३ कांड्या जप्त
वसमत ( हिंगोली) : कुरुंदा मार्गावरुन दुचाकीवर जिलेटिन स्फोटक पदार्थ कोणतीही परवानगी नसताना संशयास्पद घेऊन जाणाऱ्या दोन जणास शहर पोलीसांनी शुक्रवार रोजी जिलेटिनच्या ८३ कांड्यासह ताब्यात घेतले आहे.शहर पोलीस ठाण्यात तिन जणा विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वसमत कुरुंदा मार्गावरील एका पेट्रोल पंपा जवळ ४ फेब्रुवारी रोजी ५.३० वा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक चंद्रशेखर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि गजानन बोराटे,जमादार भगीरथ सवंडकर,दिलीप पोले यांच्या पथकाने दुचाकीवरुन जाणाऱ्या दोघांचा संशयावरून पाठलाग केला. दुचाकी थांबवून पोलिसांनी कृष्णा जैनाजी बेले (२१) , कृष्णा दत्तराव ढाकरे (२६, दोघे रा कोठारवाडी ) यांची चौकशी केली. यावेळी त्यांच्याजवळ विनापरवाना जिलेटिन या स्फोटकाच्या ८३ कांड्या आढळून आल्या. त्यांना पोलीसी खाक्या दाखविताच तो जिलेटिनसाठा संतोष चव्हाण याच्याकडून घेतल्याचे सांगितले. पोलिसांनी जिलेटिनसाठा आणि दुचाकी जप्त केली. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात सपोनि गजानन बोराटे यांच्या फिर्यादीवरुन संतोष चव्हाणसह इतर तीन जणांविरुध्द विविध कलमान्वे गुन्हा दाखल करण्यात आला.
दोषींवर कारवाई करण्यात येईल
संशायास्पद वाहतूक करणाऱ्यांची योग्य चौकशी करण्यात येत आहे. दोषींची गय केली जाणार नाही. तो साठा कुठे व का नेल्या जात होता याचा तपास करण्यात येत आहे. शहरात संशयास्पद व्यक्ती व काही प्रकार दिसून येत असेल तर नागरिकांनी याची माहिती पोलिसांना द्यावी.
- चंद्रशेखर कदम, पोलीस निरिक्षक शहर पोलीस ठाणे वसमत.