बेरोजगार तरुणांना फसविणाऱ्या टोळीचा सूत्रधार आंध्रप्रदेशातून जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 18:04 IST2021-06-26T18:03:57+5:302021-06-26T18:04:48+5:30
देशभरातील हजारो युवकांकडून कोट्यवधीची फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा वसमत पोलिसांकडून तपास

बेरोजगार तरुणांना फसविणाऱ्या टोळीचा सूत्रधार आंध्रप्रदेशातून जेरबंद
वसमत (जि. हिंगोली) : बेरोजगार तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीचा मुख्य सूत्रधार शैलेशकुमार दुबे (रा. उत्तर प्रदेश) हा वसमत शहर पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. यापूर्वी सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. आता गुरुवारी मुख्य सूत्रधारास जेरबंद करीत वसमत पोलिसांनी मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात देशभरात हजारो तरुणांकडून कोट्यवधीची फसवणूक या टोळीने केल्याचे चौकशीत समोर येत आहे.
ही टोळी तरुणांना हेरून त्यांना नोकरीचे आमिष दाखवत त्यांच्याकडून लाखो रुपये उकळायची आणि खोटे नियुक्तीपत्र देऊन फसवणूक करीत असे. या टोळीने वसमत तालुक्यातील पंडित ढवळे या तरुणास रेल्वेमध्ये नोकरी लावतो, असे सांगून १० लाख रुपये लुटले होते. त्यांनी त्याला खोटे ट्रेनिंग आणि खोटे नियुक्तीपत्र दिले होते. या प्रकरणी वसमत पोलीस ठाण्यात १३ मे राेजी गुन्हा नोंदविण्यात आला होता.
कर्नुल येथून घेतले ताब्यात
वसमत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यापासून मुख्य सूत्रधार फरार होता. मोबाइल लोकेशनच्या आधारे व पोलीस कोठडीत असलेल्या आरोपींनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी आंध्र प्रदेशातील कर्नुल भागातून मुख्य आरोपी शैलेशकुमार दुबे याला ताब्यात घेतले. आता हा सूत्रधार कोणाच्या जीवावर हा धंदा करीत होता? याचा शोध पोलीस घेत आहेत. पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, उपविभागीय पोलीस अधिकारी यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे निरीक्षक उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक शिवाजी गुरमे, साहाय्यक पोलीस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड, उपनिरीक्षक शिवसांब घेवारे आदींनी ही कामगिरी केली. मुख्य आरोपीस अटक करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक गजानन बर्गे, ढेंबरे, गोरलावाड, काळे, कातकडे आदींचे पथक गेले होते.