- इस्माईल जहागीरदारवसमत (जि. हिंगोली) : सोने आणि घर व्यवहारात फसवणूक झाल्याने मानसिक त्रासाने शहरातील संतोष कड या तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात ५ जणांविरुध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वसमत शहरातील जिजामाता नगरमध्ये राहणारा संतोष रामराव कड (४४) याने १० डिसेंबर रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी मयताचे भाऊ उत्तम रामराव कड यांनी शहर पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. फिर्यादित म्हटले की, संतोष कड यास सुनीता सूर्यकांत कातोरे, सूर्यकांत माणिकराव कातोरे, रमाकांत कातोरे या तिघांनी कमी दरात सोने देतो म्हणत १५ लाख रुपये घेतले. सोने तर दिलेच नाही. उलट रक्कमही परत न करता मानसिक त्रास दिला. तसेच हनुमंत भालेराव व दुसऱ्या एकाने घर विक्री कराराची उर्वरित ६ लाख न देता मानसिक त्रास दिला.
या सर्व त्रासाला कंटाळून मयत संतोष कड याने आत्महत्या केली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध विविध कलमांन्वये १३ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा तपास फौजदार कसबेवाड हे करीत आहेत.