पुराच्या पाण्याने मंदिराला वेढा, महाराजांसह तिघे अडकले; हिंगोली जिल्ह्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 11:28 IST2025-07-22T11:24:45+5:302025-07-22T11:28:35+5:30
मंदिरामध्ये शिवेंद्र महाराज, सुभाष सानप आणि अन्य एक असे एकूण तीन जण पुराच्या पाण्यात अडकले आहेत.

पुराच्या पाण्याने मंदिराला वेढा, महाराजांसह तिघे अडकले; हिंगोली जिल्ह्यातील घटना
हिंगोली : जिल्ह्यात आणि विशेषतः विदर्भात, सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे सेनगाव तालुक्यातील बेरडा येथील मंदिराला पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे. या मंदिरात तीन जण अडकले असून त्यांची सुटका करण्यासाठी प्रशासनाची टीम बेरडा गावाकडे रवाना झाली आहे.
सोमवारी रात्रीपासून विदर्भात जोरदार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे सेनगाव तालुक्यातील बेरडा गावातील ओढ्याला पूर आला आहे. याच पुराच्या पाण्याचा वेढा ओढ्यालगत असलेल्या मंदिराला पडला. मंदिरामध्ये शिवेंद्र महाराज, सुभाष सानप आणि अन्य एक असे एकूण तीन जण पुराच्या पाण्यात अडकले आहेत.
दरम्यान, अडकलेल्या या भाविकांना आणि ग्रामस्थांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढता यावे यासाठी माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी तहसील प्रशासनाला माहिती दिली. या माहितीनंतर तहसील प्रशासन तातडीने बेरडा गावाकडे रवाना झाले आहे.
तहसीलदार सखाराम मांडवगडे यांनी सांगितले की, "पुराचे पाणी सध्या कमी होत आहे, तरीही आम्ही तिघांनाही बाहेर काढण्यासाठी तलाठी व इतर कर्मचाऱ्यांना बेरडा गावात पाठवले आहे. बोटीचीही व्यवस्था केली जात आहे. लवकरच तिन्ही पूरग्रस्तांना सुखरूप बाहेर काढले जाईल."