गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 21:47 IST2025-09-12T21:46:59+5:302025-09-12T21:47:17+5:30
त्या महिलांचा शोध घेणे रात्री उशिरापर्यंत सुरू होते. ही घटना सायंकाळी ५ वाजेदरम्यान घडली.

गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
वसमत: तालुक्यात शुक्रवारी दुपारच्यावेळी ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. या पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला होता. दरम्यान, गुंडा गावाजवळील ओढ्याला आलेल्या पुरात शेतातून घरी येणाऱ्या दोन महिला वाहून गेल्या. त्या महिलांचा शोध घेणे रात्री उशिरापर्यंत सुरू होते. ही घटना सायंकाळी ५ वाजेदरम्यान घडली.
गुंडा शिवारात १२ सप्टेंबर रोजी दुपारी ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. या जोरदार पावसामुळे गावाजळील ओढ्याला पूर आला. सायंकाळी ५ वाजेदरम्यान शेतीकामे आटोपून घरी परतणाऱ्या गयाबाई अंबादास सारोळे (वय ५०), सखुबाई विश्वनाथ भालेराव (५२) व रमेश भालेराव हे तिघेजण एकमेकांचे हात धरून ओढ्याला आलेल्या पुरातून मार्ग काढत गावाकडे येत होते. दरम्यान रमेश भालेराव यांच्या हातून दोन्ही महिला सुटल्या आणि पुराच्या पाण्यात वाहून गेल्या.
रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरु...
ही घटना रमेश यांनी ग्रामस्थांना सांगितली. त्यानंतर तात्काळ जवळा बाजार समितीचे सभापती शिवाप्पा भालेराव, माणिक भालेराव यांच्यासह इतर नागरीकांनी घटनास्थळी धाव घेतली व त्या दोन महिलांचा शोध घेतला. परंतु रात्री उशिरापर्यंत दोन्ही महिला आढळून आल्या नाहीत. घटनास्थळी उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार शारदा दळवी, मंडळ अधिकारी तलाठी व महसूल पथक पोहोचले होते.