हिंगोलीत दोन दिवसांच्या अतिवृष्टीत पाच जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 18:10 IST2021-09-09T18:08:37+5:302021-09-09T18:10:18+5:30
rain in hingoli : हिंगोली -समगा-येडूत मार्गावरील पूल तुटल्याने नुकसान झाले असून कळमनुरी तालुक्यातील सांडस-सालेगाव येथील पूल तुटला आहे.

हिंगोलीत दोन दिवसांच्या अतिवृष्टीत पाच जणांचा मृत्यू
हिंगोली : जिल्ह्यात ६ व ७ सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीत विविध ठिकाणी पाच माणसे व एक म्हैस वाहून गेली. तर २२ घरांची पडझड झाल्याचा अहवाल शासनास सादर करण्यात आला आहे. पिकांच्या नुकसानीचे हजारो हेक्टरचे नुकसान झाले असले तरीही अद्याप पंचनामे नसल्याने अहवाल नाही.
कळमनुरी तालुक्यातील येलकी येथील लखन गजभारे (वय २४), वसमत तालुक्यातील कानोसा येथील अजय मस्के (वय २१), औंढा तालुक्यातील लोहरा बु. येथील मारोती भोकरे (वय ६०), सेनगाव तालुक्यातील बरडा येथील उद्धव काळे (वय ३४, रा. बरडा) या चौघांचा ७ सप्टेंबर रोजी वाहून गेल्याने मृत्यू झाला. तर सवड येथे एकाची म्हैस वाहून गेली आहे. याशिवाय पार्डी पोहकर येथील चांगदेव ज्ञानबा पोहकर (वय ४५) यांचा मृतदेह सापडला असून याची अजून प्रशासनाकडे नोंद नाही. तर ४ सप्टेंबर रोजी सुजाता बबन खिल्लारे (रा. पळसोना) व संजय सीताराम धनवे (रा. नंदगाव) यांचा पुरात वाहून गेल्याने मृत्यू झाला होता.तर कळमनुरी तालुक्यातील कान्हेगाव, सालेगाव, येलकी या गावांचा संपर्क तुटला होता. त्याचबरोबर हिंगोली -समगा-येडूत मार्गावरील पूल तुटल्याने नुकसान झाले असून कळमनुरी तालुक्यातील सांडस-सालेगाव येथील पूल तुटला आहे.
२२ घरांची पडझड
जिल्ह्यात हिंगोली ६, कळमनुरी १, वसमत ९, औंढा ३, सेनगाव ३ अशी २२ घरांची अंशत; पडझड झाल्याचा अहवाल संबंधित तहसील कार्यालयांकडून जिल्हाधिकारी कार्यालयास सादर झाला आहे.
हेही वाचा - मराठवाड्यात का होतेय ढगफुटी ? हवेच्या ‘डाऊन ट्रॅप’चा नेमका संबंध किती, जाणून घ्या