ताप आला... कोरोना तर नाही झाला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:28 AM2021-04-15T04:28:30+5:302021-04-15T04:28:30+5:30

हिंगोली : जिल्ह्यात सध्या ग्रामीण भागात काेरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. सध्या ताप आला की, उन्हाळ्यामुळे तो अंगावर ...

Fever came ... Corona didn't? | ताप आला... कोरोना तर नाही झाला?

ताप आला... कोरोना तर नाही झाला?

Next

हिंगोली : जिल्ह्यात सध्या ग्रामीण भागात काेरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. सध्या ताप आला की, उन्हाळ्यामुळे तो अंगावर काढला जात असून यामुळे नंतर अख्खे कुटुंबच कोरोनाच्या विळख्यात सापडत आहे. यात ज्येष्ठांना जीव गमवावा लागत आहे. गिरगाव, डोंगरकडा, आखाडा बाळापूर आदी दहा ते पंधरा गावे आता हॉटस्पॉट बनली आहेत. ग्रामीण भागात कोरोना पसरल्याने सामूहिक संसर्गाच्या टप्प्यावर जिल्हा आला आहे. ग्रामीण भागात कोणतेच नियम पाळले जात नाहीत. मास्क, सामाजिक अंतर व सॅनिटायझर या तिन्ही बाबींचे जणू वावडेच आहे. यात साधारणपणे तापापासूनच कोरोनाची लक्षणे दिसण्यास सुरुवात होते. मात्र तोच अंगावर काढला जातो. यात अनेक तरुण उपचाराविना बरेही होत असले तरीही घरातील व गावातील वृद्धांना मात्र हाच ताप अत्यवस्थ करीत आहे. त्यामुळे गंभीर रुग्णांची संख्या साडेतीनशेवर गेली. अनेकांना आता बेडही मिळत नाही. श्वास घेताना दम लागू लागला, छातीच्या सीटीस्कॅनचा स्कोअर पंधराच्याही पुढे आल्यावर कोरोना झाल्याचे कळत आहे. अशा परिस्थितीत डॉक्टरांनाही सेवा देताना अडचणी येत आहेत. त्यामुळे कोणताही ताप आला तरीही कोरोना चाचणी करून घेणे आता गरजेचे बनले आहे. यासाठी पार आरोग्य उपकेंद्रातही कोरोनाची निदान अँटिजन चाचणी तरी झाली पाहिजे. शिवाय तापाचा रुग्ण घरात वेगळा राहील, याची काळजी घेणेही अनिवार्य बनले आहे.

ग्रामपातळीवरील समित्यांनो जागे व्हा

ज्या गावात अजूनही कोरोनाने शिरकाव केला नाही, अशा गावातील लोकांनी आता सजग राहणे गरजेचे आहे. आप्तेष्ट, बाहेर फिरणारी मंडळी यांच्यामुळे कधीही कोरोना गावात येऊ शकतो. जिल्ह्यात अजूनही २७० ते ३०० गावे कोरोनाचा प्रवेश गावात होऊ न देण्यात यशस्वी ठरली. या गावांना ग्रीन गावे समजून तेथे सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील, तलाठ्यांनी आवश्यक प्रतिबंध केले तर पंधरा दिवसांच्या टाळेबंदीनंतर जिल्ह्याचे चित्र सकारात्मक बनू शकते.

रुग्ण बरे झालेले असल्यास...

ज्या गावात कोरोनाचे रुग्ण आढळले होते. मात्र मृत्यू नाही, कुणी अत्यवस्थ झाले नाही व आता रुग्ण नाहीत, अशीही जवळपास दोनशे गावे आहेत. अशा गावांनी या रुग्णांचा अनुभव इतरांना सांगून कोरोनामुळे होणारे आरोग्याचे नुकसान पटवून दिले तर ही गावे पुन्हा कोरोनाचा शिरकाव होणार नाही, याची काळजी घेऊ शकतील.

रेड झोनमधील गावांत जाणे टाळा

ग्रामीण भागातील लोकांना आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला की, एकमेकांना भेटण्यास जाणे अगत्याचे वाटते. मात्र ज्या गावात मोठ्या संख्येने रुग्ण आढळत आहेत. रुग्ण अत्यवस्थ होत आहेत, मृत्यू होत आहेत, अशा गावांत ग्रामस्थांनी तर सामाजिक अंतर, मास्क, सॅनिटायझर ही काळजी घेणे गरजेचेच आहे. मात्र इतर गावांतील लोकांनी अशा गावांत साथ ओसरेपर्यंत जाणे टाळले पाहिजे. अन्यथा इतर गावेही रेड झोनमध्ये येण्यास विलंब लागणार नाही.

ताप आला की चाचणी कराच

ग्रामीण भागातील लोकांना आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर फार भरवसा असतो. त्यात ते ताप आला की अंगावर काढतात. मात्र पूर्वी जसे कोणताही ताप आला की हिवतापाची चाचणी व्हायची आता तशी कोरोनाची चाचणी करायची गरज आहे. कारण अपुऱ्या जागा, एकत्रित कुटुंब पद्धती, मनमोकळेपणे एकमेकांना भेटण्याची सवय असल्याने इतरांना संसर्ग लवकर होण्याची शक्यता आहे. यामुळेच ग्रामीण भागात एकदा रुग्ण आढळला की, संख्या वाढतच चालली आहे.

जिल्ह्यातील आतापर्यंतचे रुग्ण ८९६८

रुग्णांमध्ये ज्येष्ठांची संख्या १२३६

आतापर्यंतचे मृत्यू १२९

सध्या ऑक्सिजनवरील रुग्ण ३२९

Web Title: Fever came ... Corona didn't?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.