कळमनुरीत मुक्त संचार करणाऱ्या हद्दपार आरोपीला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 18:02 IST2019-08-01T17:57:49+5:302019-08-01T18:02:05+5:30
आरोपीस न्यायालयाने कळमनुरी पोलीस ठाणे हद्दीतून दोन वर्षांसाठी हद्दपार केले आहे.

कळमनुरीत मुक्त संचार करणाऱ्या हद्दपार आरोपीला अटक
हिंगोली : कळमनुरी शहरातील इंदिरानगर येथून एका घटनास्थळाची पाहणी करून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक परतताना त्यांना कळमनुरी न्यायालयाने हद्दपार केलेला आरोपी ३० जुलै रोजी निदर्शनास आला. सदर आरोपीचे नाव बबलूसिंग उर्फ हनुमानसिंग हत्यारसिंग टाक असे आहे.
सदर आरोपीची चौकशी केली असता त्याने पोलिसांना एकही समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे यांनी व त्यांच्या पथकाने सदर आरोपीस ताब्यात घेतले. बबलूसिंग उर्फ हनुमानसिंग हत्यारसिंग टाक यास न्यायालयाने कळमनुरी पोलीस ठाणे हद्दीतून दोन वर्षांसाठी हद्दपार केले आहे. परंतु या आरोपीने न्यायालयाची परवानगी न घेता कळमनुरी हद्दीत प्रवेश केला. ही बाब पोलिसांच्या निदर्शनास आल्यामुळे त्यास पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे यांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक योगेशकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, पोनि जगदीश भंडारवार यांच्या मार्गदर्शनात पोउपनि शिवसांब घेवारे, पोउपनि किशोर पोटे, पोहेकॉ बालाजी बोके, पोना संभाजी लेकुळे, भगवान आडे, किशोर कातकडे, राजू ठाकूर, विठ्ठल काळे, दीपक पाटील आदींनी केली.