सोयाबीन पाच फुटांपर्यंत वाढूनही शेंगा लागेनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:30 IST2021-09-03T04:30:23+5:302021-09-03T04:30:23+5:30
हिंगाेली : जिल्ह्यात अनेक ठिकाणी सोयाबीन पिकाची वाढ ५ फुटांपर्यंत झाली. मात्र काही कंपनीच्या बियाणाच्या झाडाला शेंगाच लागल्या नसल्याचे ...

सोयाबीन पाच फुटांपर्यंत वाढूनही शेंगा लागेनात
हिंगाेली : जिल्ह्यात अनेक ठिकाणी सोयाबीन पिकाची वाढ ५ फुटांपर्यंत झाली. मात्र काही कंपनीच्या बियाणाच्या झाडाला शेंगाच लागल्या नसल्याचे समोर आले आहे. ५ फुट झाडे वाढूनही शेंगा लागल्या नसल्याने शेतकऱ्यांतून संताप व्यक्त केला जात आहे. यासंदर्भात कृषी विभागाकडे ४ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
अतिवृष्टीने गतवर्षी सोयाबीन पिकाला सर्वाधिक फटका बसला. त्यामुळे उत्पादनात मोठी घट झाली. सुरुवातीला ३ हजारांपर्यंत असलेला सोयाबीनचा भाव प्रती क्विंटल १० हजारांपर्यंत पोहचला होता. कापसासारख्या नगदी पिकाच्या दरात मोठी घट झाली होती. त्यामुळे यावर्षी बहुतांश शेतकरी सोयाबीन पिकाकडे वळले आहेत. यावर्षी सोयाबीनचा पेरा गतवर्षीपेक्षा जवळपास दुप्पट वाढला आहे. एकीकडे सोयाबीनला भाव जास्त मिळत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी जवळचे शिल्लक सोयाबीनची विक्री करण्याला पसंती दिली. तर दुसरीकडे बियाणांची टंचाई जाणवणार हे लक्षात घेऊन काही सोयाबीन बियाणे विक्री कंपन्यांनी आपले उखळ पांढरे करून घेण्याची संधी सोडली नाही. त्यामुळे काही कंपनीच्या सोयाबीन बियाणाची उगवण झाली. झाडेही पाच फुटापर्यंत वाढली. मात्र झाडाला शेंगाच लागल्या नाहीत. पाच फुट झाडे वाढूनही शेंगा लागत नसल्याचे समोर आल्यानंतर शेतकऱ्यांच्या पायाखालची वाळूच सरकली. आतापर्यंत शेंगा लागतील या अपेक्षावर सोयाबीन उत्पादक शेतकरी होते. आता मात्र कृषी विभागाकडे शेंगा लागत नसल्याबाबत तक्रारी येत आहेत. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडे ४ शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या आहेत. यासंदर्भात कृषी विभागाने संबधीत शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पाहणी करण्यासंदर्भात बियाणे विक्री करणाऱ्या दुकानदारासह बियाणे कंपनीला लेखी कळविले होते. मात्र याबाबत अद्याप पुढे काय कारवाई झाली, याची माहिती समजू शकली नाही.
२ लाख ५७ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन
जिल्ह्यात यावर्षी सोयाबीन पेरणीसाठी सरासरी क्षेत्र १ लाख ६८ हजार ४३४ हेक्टर एवढे आहे. मात्र प्रत्यक्षात २ लाख ५७ हजार १४ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सोयाबीनला मिळालेल्या वाढत्या दरामुळे शेतकऱ्यांनी यावर्षी सोयाबीन पिकाला पसंती दिली आहे.
३७ हजार ७१२ क्विंटल सोयाबीन बियाणाची विक्री
कृषी विभागाने यावर्षी सार्वजनिक व खाजगी मिळून ६९ हजार २१५ क्विंटल सोयाबीन बियाणाची मागणी केली होती. यापैकी ३८ हजार ५ क्विंटल बियाणाचा पुरवठा झाला. त्यापैकी ३७ हजार ७१२ क्विंटल सोयाबीन बियाणाची विक्री झाली. यामध्ये ३ हजार २०० सार्वजनिक तर ३४ हजार ५१२ क्विंटल खासगी बियाणाचा समावेश आहे. सध्या जिल्ह्यात २९३ क्विंटल सोयाबिनचे बियाणे शिल्लक राहिले आहे.