जातीचा उंबरठा ओलांडणाऱ्या आठ जोडप्यांना अर्थसाहाय्याची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:32 IST2021-02-09T04:32:36+5:302021-02-09T04:32:36+5:30
हिंगोली : जाती-जातींतील अपृश्यतेचे निवारण व्हावे, यासाठी आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना शासनातर्फे ५० हजारांचे अर्थसाहाय्य दिले जाते. जिल्ह्यात दोन ...

जातीचा उंबरठा ओलांडणाऱ्या आठ जोडप्यांना अर्थसाहाय्याची प्रतीक्षा
हिंगोली : जाती-जातींतील अपृश्यतेचे निवारण व्हावे, यासाठी आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना शासनातर्फे ५० हजारांचे अर्थसाहाय्य दिले जाते. जिल्ह्यात दोन वर्षांत २४ जोडप्यांना अर्थसाहाय्य मिळाले असून, केवळ आठ जोडप्यांना अर्थसाहाय्य मिळण्याची प्रतीक्षा आहे. निधीप्राप्त झाल्यास मार्चअखेर या जोडप्यांनाही अर्थसाहाय्य दिले जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
समाजातील अस्पृश्यतेचे निवारण व्हावे, तसेच आंतरजातीय विवाहास प्रोत्साहान मिळावे, यासाठी शासनाच्या समाजकल्याण विभागाच्या वतीने प्रत्येक जोडप्यास ५० हजारांचे अर्थसाहाय्य दिले जाते. यासाठी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडे अर्ज सादर करावा लागतो. वराचे वय २१ व वधूचे वय १८ वर्षे पूर्ण असणाऱ्या जोडप्यांना या योजनेसाठी प्रस्ताव सादर करता येतो. तसेच प्रस्तावासोबत विवाह नोंदणी, दाखला, वधू-वराचा एकत्रित फोटो जोडावा लागतो. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडे दोन वर्षांत ३२ जोडप्यांनी अर्थसाहाय्यासाठी प्रस्ताव सादर केले होते. त्यापैकी २४ प्रस्तावांना मंजुरी दिली असून, या जोडप्यांच्या संयुक्त खात्यावर ५० हजार रुपयांचा धनाकर्ष जमा करण्यात आला आहे. आता केवळ आठ प्रस्ताव आहेत. हे प्रस्तावही आता आल्याने मार्चअखेर या जोडप्यांच्या संयुक्त खात्यावर ५० हजारांचे अर्थसाहाय्य जमा करण्यात येणार असल्याचे समाजकल्याण विभागातून सांगण्यात आले. आलेले प्रस्ताव समाजकल्याण अधिकारी तत्काळ मार्गी लावत असल्याने आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांतून समाधानाचे वातावरण पाहावयास मिळत आहे.
--------
अशी मिळते मदत
१ फेब्रुवारी २०१० पूर्वी आंतरजातीय विवाह झाला असल्यास १५ हजार रुपये आणि त्यानंतर विवाह झाला असल्यास ५० हजार रुपयांचे अनुदान मिळते.
----------
यांना मिळते मदत
राज्यातील रहिवासी असलेल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गासाठी ही योजना आहे. आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांपैकी या जातीतील एक व दुसरी व्यक्ती सवर्ण हिंदू, लिंगायत, जैन, शिख यांच्यातील असतील तर अशा जोडप्यांना अर्थसाहाय्य दिले जाते. तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती यामधील अंतरप्रवर्गात आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांनाही ५० हजारांचे अर्थसाहाय्य देण्यात येते.
३२
दोन वर्षांत झालेले आंतरजातीय विवाह
----------
२४
जोडप्यांना मिळाली मदत
-------------
जिल्ह्यात दोन वर्षांत २४ आंतरजातीय विवाह झाले आहेत. या २४ जोडप्यांना ५० हजारांचे अर्थसाहाय्य देण्यात आले आहे. आता आठ प्रस्ताव प्राप्त झाले असून, या जोडप्यांनाही मार्चअखेर ५० हजारांचे अर्थसाहाय्य मिळून जाईल.
-एस. जी. वागतकर, समाजकल्याण निरीक्षक
--------------