समोरील वाहनाच्या प्रखर हेडलाईटमुळे चालकाचे नियंत्रण सुटले, बस उलटून ६ प्रवासी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2023 09:33 IST2023-01-10T09:32:44+5:302023-01-10T09:33:15+5:30
बसमध्ये ३० प्रवासी होते, पहाटे झाला अपघात

समोरील वाहनाच्या प्रखर हेडलाईटमुळे चालकाचे नियंत्रण सुटले, बस उलटून ६ प्रवासी जखमी
- अरूण चव्हाण
आडगाव रंजे ( जि.हिंगोली): परभणी ते हिंगोली रस्त्यावरील आडगाव रंजे ते बोरी पाटी दरम्यान १० जानेवारी पहाटे पाच ते साडेपाचच्या सुमारास चंद्रपूरकडून आंबेजोगाईकडे जाणारी बस उलटली. यात बसमधील पाच ते सहा प्रवासी जखमी झाले आहेत.
आडगाव रंजे गावापासून दोन किलोमीटर अंतरावर आंबेजोगाई आगाराची बस (MH 09 FL 1020 ) चंद्रपूरहून आंबेजोगाईकडे जात असताना हा अपघात झाला. ही बस रस्त्याच्याकडेला जाऊन उलटली. या बसमध्ये अंदाजे 25 ते 30 प्रवासी होते. त्यापैकी पाच ते सहा प्रवासी जखमी झाले असून जखमींना उपचारासाठी परभणी येथे दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, पहाटेच्या वेळी समोरून प्रखर दिव्याचे वाहन आले.यावेळी चालकाला रस्ता रुंद आहे की अरुंद आहे हेच कळाले नाही. स्टेरिंगवरील नियंत्रण सुटले आणि बस खाली जाऊन उलटली, असे चालकाने सांगितले.
घटनास्थळी हट्ट्याचे सपोनि गजानन बोराटे ,पोलीस उपनिरीक्षक सतीश तावडे, जमादार राजेश ठाकूर, शेख मदार ,लाखाडे सह कर्मचाऱ्यांनी व गावकऱ्यांनी जखमींची मदत केली.