शेतीसाठी मजूर देता का मजूर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:37 IST2021-01-08T05:37:35+5:302021-01-08T05:37:35+5:30

शेतीत मजूर मिळत नसल्याने त्यांची जागा घेण्यासाठी यांत्रिकी उपकरणे येत आहेत. अनेक बाबतीत त्यामुळे मजुरांची गरज उरली नाही. तरीही ...

Do you pay labor for agriculture? | शेतीसाठी मजूर देता का मजूर!

शेतीसाठी मजूर देता का मजूर!

शेतीत मजूर मिळत नसल्याने त्यांची जागा घेण्यासाठी यांत्रिकी उपकरणे येत आहेत. अनेक बाबतीत त्यामुळे मजुरांची गरज उरली नाही. तरीही पेरणी, काढणी, मळणीसारख्या अनेक कामांसाठी मजुरांशिवाय पर्याय नाही. त्यामुळे या मजुरांचे महत्त्व कायम आहे. अनेक ठिकाणी शेतीत राबण्याऐवजी मजूर मोठ्या शहरात कामाला जात आहेत. त्यातच यांत्रिकीकरण आले असले तरीही त्यात मोठ्या शेतकऱ्यांच्या मालकीची अवजारे असल्याने त्यांना परवडते. इतरांना त्यासाठी मोठा दाम मोजावा लागतो. तो मजुरांपेक्षाही जास्त लागतो. काम कमी वेळेत होत असले तरीही हा खर्च परवडणारा नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. बी-बियाणे, खते, कीटकनाशके यांचेही वाढते दर अन् मजुरांचा प्रश्न शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे.

काय म्हणतात शेतकरी...

शेतीला यांत्रिकीकरणाची जोड दिली तर फायदा आहे. कारण, मजूर मिळत नाहीत. कोणी बाहेर मजुरीला जाते. तर काहींना शासनाच्या योजनांचा लाभ मिळत असल्याने कामाची गरज राहिली नाही. बेभाव मजुरी देवून कामे करावे तर शेती आधीच तोट्यात आहे. त्यात ही भर पडल्यास वाटोळे होणार आहे, असे सवडचे कृष्णा जाधव म्हणाले.

यांत्रिकीकरणामुळे मजुरीतील ९० टक्के बचत होते. कोळपणी करताना शंभर मजुरांवर १५ हजारांचा खर्च झाला असता. मात्र, ट्रॅक्टरने तीन हजारांत हे काम झाल्याचा अनुभव आहे. त्यातच मजूरही मिळत नाहीत. त्यामुळे शेतीत जेवढे यांत्रिकीकरण वाढेल तेवढे चांगले आहे, असे गोरेगाव येथील विनायकराव खिल्लारी यांनी सांगितले.

मजुरांशिवाय शेती करणे अवघड आहे. सगळेच यांत्रिकीकरणाने होत नाही. यांत्रिकी वापर वाढविला तर तो मजुरीपेक्षाही महागात पडतो. अल्पभूधारक शेतकऱ्यांना मालकीची साधने घेणे शक्य नाही. मात्र, मजूर एकतर मिळत नाही. मिळाला तर मजुरीही वाढली. शिवाय पूर्वीसारखे कामाचे तास राहिले नसल्याने शेतीचे गणित बिघडल्याचे अंभेरी येथील बालाजी पारस्कर यांनी सांगितले.

कृषी यंत्रांनी घेतली मजुरांची जागा

शेतात आता नांगरणी, वखरणीसह पेरणीची कामे करायला मजुरांची गरज उरली नाही. ट्रॅक्टरचा वापर करून ही कामे मोठ्या प्रमाणात केली जात आहेत. शिवाय काहींनी तर निंदणीचेही काम यावर करणे सुरू केले. अजून काढणीसाठी उपाय आला नसला तरी गहू काढणीला बाहेरून आलेले मळणीयंत्र कामी पडतात.

यंत्राने होणारी कामे

नांगरणी, वखरणी, पेरणी, जास्त अंतराच्या पिकांची कोळपणी, गव्हासारख्या काही पिकांची काढणी आदी कामे.

Web Title: Do you pay labor for agriculture?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.