हिंगोली : राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय आयुक्तांच्या आदेशान्वये सन २०२०-२१ या वर्षात युवा महोत्सव या योजनेतंर्गत जिल्हा, विभाग व राज्यस्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन ऑनलाईन पध्दतीने २८ डिसेंबर राेजी करण्यात येणार आहे.
हिंगोली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन केले आहे. काेविडच्या पार्श्वभूमीवर यावर्षी शासनाच्या प्राप्त सूचनेनुसार, युवा महोत्सवाचे आयोजन ऑनलाईन पध्दतीने करण्यात येणार आहे. यामध्ये सहभागी कलाकारांनी आपले सादरीकरण हे विद्यालय, महाविद्यालयाच्या रंगमंचावर किंवा आपल्या आवडत्या रंगमंचावर करावे.
युवा महोत्सवात लोकनृत्य या कलाप्रकारासाठी कलाकारांची संख्या सहकलाकारासह २० असणे आवश्यक असून कला सादर करण्यासाठी १५ मिनिटांचा वेळ आहे. लोकगीतासाठी कलाकारांची संख्या २० असणे आवश्यक असून कला सादर करण्यासाठी ७ मिनिटांचा वेळ आहे. एकांकिकेसाठी कलाकारांची संख्या १२ असणे आवश्यक असून ४५ मिनिटांचा वेळ आहे. शास्त्रीय गायनसाठी कलाकाराची संख्या एक असून यासाठी १५ मिनिटांचा वेळ आहे. शास्त्रीय वाद्य यामध्ये सितार, बासरी, वीणा ही कलेसाठी कलाकारांची संख्या प्रत्येकी एक याप्रमाणे असून ही १५ मिनिटांचा वेळ आहे. तबला, मृदंग, हार्मोनियम, गिटार ही कला सादर करण्यासाठी कलाकाराची संख्या प्रत्येकी एक याप्रमाणे असून १० मिनिटांचा वेळ आहे. शास्त्रीय नृत्य यामध्ये मणिपुरी, ओडीसी, भरतनाट्यम्, कथ्थक, कुचीपुडी ही कला सादर करण्यासाठी कलाकाराची संख्या प्रत्येकी एक याप्रमाणे असून १५ मिनिटांचा वेळ आहे. वक्तृत्वसाठी कलाकराची संख्या एक असून यासाठी ४ मिनिटांचा वेळ आहे. अशा एकूण ५६ कलाकारांची संख्या असणार आहे.
वरील कलाप्रकारांत कला सादर करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. या महोत्सवात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील १५ ते २९ वर्षे वयोगटातील युवक-युवती, युवक मंडळे, विद्यालय, महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिंनी सहभागी होऊ शकतात. युवक महोत्सवात सहभागी होण्यासाठी आपल्या प्रवेशिका मंडळाच्या, शाळेच्या, कॉलेजच्या लेटरपॅडवर कलाकारांचे नाव, जन्मदिनांक व स्वाक्षरी इत्यादी माहिती भरुन २६ डिसेंबरपर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, लिंबाळा, हिंगोली येथे प्रत्यक्ष सादर कराव्यात किंवा कार्यालयाच्या ई-मेल dsohingoli01@gmail.com किंवा कार्यालयाशी संपर्क करावा.
हिंगोली जिल्ह्यातील युवक-युवतींनी, शाळा, महाविद्यालय, युवक मंडळे यातील इच्छुक कलावंत स्पर्धकांनी जास्तीत जास्त संख्येने या युवक महोत्सवात ऑनलाईन/व्हर्च्युअल पध्दतीने सहभागी होऊन आपल्या अंगी असलेले कलागुण सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.