काळाचा घाला ! चिमुकलीच्या अंत्यविधीची तयारी सुरु असताना धडकली मुलाच्या मृत्यूची वार्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2020 17:27 IST2020-10-23T17:24:48+5:302020-10-23T17:27:05+5:30
दोन दिवसांपूर्वीचा आजोळी गेले होते भाऊ-बहिण

काळाचा घाला ! चिमुकलीच्या अंत्यविधीची तयारी सुरु असताना धडकली मुलाच्या मृत्यूची वार्ता
आखाडा बाळापूर ( हिंगोली ) : आईसोबत आजोळी आलेल्या चिमुकल्या बहीण-भावांचा करुण अंत झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री घडली. बाळापूरच्या रुग्णालयात मृत घोषित केलेल्या चिमुकल्या बहिणीवर अंत्यसंस्कार करण्याची तयारी करत असतानाच तिकडे आजोळी भाऊही मरण पावल्याची खबर धडकल्याने सारे सुन्न झाले. बहिण-भावाच्या मृत्यूच्या घटनेमुळे डोंगरगावावर शोककळा पसरली असून त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
याप्रकरणी ग्रामस्थ व बाळापुर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील डोंगरगाव पूल येथील रहिवासी असलेले अमोल शिंदे हे आखाडा बाळापूर येथे टेलरिंगचे काम करतात. दोन दिवसांपूर्वी शिंदे यांच्या पत्नी त्यांना आराध्या ( १३ महिने ) व आर्यन ( ३ वर्ष ) या दोन मुलांसोबत माहेरी मौजे कवळी ( ता. हदगाव जि. नांदेड ) आल्या. गुरुवारी ( दि. 22 ) रात्री नऊ वाजेदरम्यान आराध्याची प्रकृती बिघडल्याने तिला आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. यानंतर शिंदे कुटुंब बाळापुर येथील घरी परतले. रात्र जागून काढत त्यांनी सकाळी अंत्यविधीची तयारी सुरु केली. मात्र याच दरम्यान आजोळी असलेल्या आर्यनचा मृत्यू झाल्याची वार्ता धडकली. एकाच वेळी बहिण-भावाचा मृत्यूने सारेच सुन्न झाले. दोन्ही चिमुकल्यांच्या मृत्यूचे कारण अस्पष्ट आहे.