गर्दीत पायावर पाय पडल्याने राडा; दोन गटात हाणामारीत ११ जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2023 16:03 IST2023-08-12T16:03:02+5:302023-08-12T16:03:19+5:30
गर्दीत चालताना पायावर पाय पडल्यामुळे दोन युवकांमध्ये शाब्दिक चकमक झाली.

गर्दीत पायावर पाय पडल्याने राडा; दोन गटात हाणामारीत ११ जण जखमी
कळमनुरी: चालताना गर्दीत पायावर पाय पडल्याच्या कारणावरून शहरात दोन गटात शुक्रवारी मध्यरात्री १ वाजता राडा झाला. तुंबळ हाणामारीत दोन्ही गटातील ११ जण जखमी झाले आहेत.
गर्दीत चालताना पायावर पाय पडल्यामुळे दोन युवकांमध्ये शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर वाद वाढत गेला. या वादाचे पर्यावसान दोन गटात हाणामारीत झाले. या हाणामारीत काहीजण जखमी झाले या जखमींना येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. येथेही दोन गटात हाणामारी झाली. या हाणामारीत ११ जण जखमी झाले.
ही माहिती पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे, फौजदार कृष्णा सोनुळे, माधव भडके, प्रशांत शिंदे, संजय राठोड, गुलाब जाधव, बापूराव अंभोरे ,नागोराव व्हडगीर आदीं घटनास्थळी येऊन त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. यावेळी मेहराज नाईक, शेख अल्ताफ, म.अफनाानोद्दीन, शेख सिबतेन, सोहेल अली, फारुख अली, नोमान पठाण, लूकमानुद्दीन सिद्दिकी, इरफान पठाण ,सलमान पठाण ,ओसामा सिद्दिकी, हे अकरा जण जखमी झालेले आहेत. यातील गंभीर जखमी असलेल्या सहा जणांना हिंगोली येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले.