निर्बंधांना शिथिलता देताच बाजारपेठेत गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:31 IST2021-05-07T04:31:14+5:302021-05-07T04:31:14+5:30
६ मे रोजी दहा दिवसांनंतर सर्वच बाजारपेठेतील दुकानांना शिथिलता मिळाल्याचे चित्र होते. त्यामुळे नागरिकांनी बाजारपेठेत एकच गर्दी केली होती. ...

निर्बंधांना शिथिलता देताच बाजारपेठेत गर्दी
६ मे रोजी दहा दिवसांनंतर सर्वच बाजारपेठेतील दुकानांना शिथिलता मिळाल्याचे चित्र होते. त्यामुळे नागरिकांनी बाजारपेठेत एकच गर्दी केली होती. ११ वाजेपर्यंतच दुकानांना मुभा असताना गर्दी मात्र दोन वाजेपर्यंत कायम असल्याचे चित्र पाहायला मिळत होते. हिंगोली जिल्ह्यात बाजारपेठेतील निर्बंध उठले की नागरिक शिस्त पाळायला विसरत असल्याचे चित्र कायम दिसून येते. मात्र ही शिस्त पाळली तर कोरोनाचा कहरही कमी होईल आणि बाजारपेठेवर येणारे निर्बंधही येणार नाहीत, या अंगाने कोणीच विचार करायला तयार नाही.
दुकानांवर गेल्यावर शिस्तीत सामाजिक अंतराचा नियम पाळून खरेदी केल्यास आपण कोरोनापासून बचाव करू शकतो, याचा विसरच पडतो. खरेदीची घाईच एवढी असते की, त्यात सामाजिक अंतराचे पालनच केले जात नाही. शिवाय अजूनही अनेकांना मास्कचे महत्त्व कळाले नसल्याचे दिसत आहे. जुजबी रुमाल बांधण्याचीही तसदी अनेकजण घेत नाहीत. एवढेच काय तर अनेक विक्रेत्यांनाही आज मास्क नसल्याचे दिसून येत होते. अनेक दुकानांवरील गर्दी तर जीवघेणी होती. भाजीपाला विक्रेत्यांनी मोकळ्या मैदानावर थाटलेल्या दुकानांवर मात्र चांगले अंतर राखल्याचे दिसून येत होते, तर अनेक ग्राहकही त्यामुळे सामाजिक अंतराचा नियम पाळताना दिसत होते.
आता एक दिवसाचा ब्रेक
दहा दिवसांनंतर बाजारपेठ उघडल्यामुळे कदाचित अनेक ठिकाणी गर्दी झाली असावी. मात्र, आता एक दिवसाच्या ब्रेकनंतर पुन्हा बाजारपेठ उघडली जाणार आहे. त्यामुळे आता यावेळी तरी गर्दी होणार नाही, अशी काळजी नागरिकांनी घेणे गरजेचे आहे. बाजारपेठेत नागरिकांचा वावर तर राहणार आहे, मात्र सामाजिक अंतर, मास्क व सॅनिटायझरचा नियम पाळणे गरजेचे आहे.