Crime against five for refusing to be quarantined; Excitement over a positive report | क्वॉरंटाईन होण्यास नकार देण्याऱ्या पाच जणांवर गुन्हा; एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ

क्वॉरंटाईन होण्यास नकार देण्याऱ्या पाच जणांवर गुन्हा; एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ

ठळक मुद्देपाच जणांनी क्वॉरंटाईन होण्यास नकार दिला

हिंगोली :  तालुक्यातील हनवतखेडा येथे परत आलेल्या ५ जणांपैकी १ व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. ठाणे जिल्ह्यातून गावी परल्यानंतर या सर्वांना विलगीकरण कक्षात जाण्यासाठी सूचना दिल्या तरी त्यांनी नकार दिला. त्यामुळे वरील पाच जणांविरूद्ध नर्सी नामदेव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिंगोली तालुक्यातील हनवतखेडा येथील सुभाष मारुती जाधव (४८), पंचफुलाबाई सुभाष जाधव (४५), गणेश सुभाष जाधव (२०), गुरुदेव सुभाष जाधव (१८) आणि  दुसरा एक अल्पवयीन मुलगा हे सर्वजण कामानिमित्त ठाणे जिल्ह्यातील धारणा येथे गेले होते. २५ जून रोजी रात्रीच्या सुमारास हे सर्वजण आपल्या गावी हनवतखेडा येथे परतले. गावात आल्यानंतर ग्रामसमितीने या सर्वांनाच शासकीय रुग्णालयात जाऊन तपासणी करून घेण्याची सूचना केली. परंतु त्यांनी तपासणीसाठी न जाता गावातील शाळेतच मुक्काम ठोकला. 

वारंवार सूचना देऊनही ते संस्थात्मक विलगिकरणात गेले नाहीत. शिवाय ग्रामसेवक आणि ग्राम समितीतील सदस्यांना उलट आम्ही येथेच राहणार कुठे जाणार नाही असे सुनावले. त्यामुळे २९ जून रोजी हिंगोली येथील सामान्य रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेतून पोलीस बंदोबस्तात त्यांना सरकारी दवाखान्यात आणले. सर्वांचे स्वॅब नमुने घेऊन तपासासाठी पाठविण्यात आले. त्यामधील एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्यामुळे इतरांना साथ रोगाचा धोका निर्माण होवू शकतो हे माहिती असताना, आणि वेळोवेळी सूचना देऊनही शासकीय आदेशांचा भंग केल्याने याबाबत ग्रामसेविका मीनाक्षी पंडितकर यांनी नर्सी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून वरील पाच जणांविरूद्ध साथरोग नियंत्रण कायदा, आपत्ती व्यवस्थापन कायदा यासह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Crime against five for refusing to be quarantined; Excitement over a positive report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.