पोस्ट कोविड रूग्णांचे समुपदेशन; रुग्ण कमी असल्याने ओपीडी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:26 IST2020-12-24T04:26:50+5:302020-12-24T04:26:50+5:30
अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांना नंतरही अनेक त्रास होत असल्याचे समोर आले आहे. त्यात काही वृद्धांना तर फायब्रोसिसच्या ...

पोस्ट कोविड रूग्णांचे समुपदेशन; रुग्ण कमी असल्याने ओपीडी नाही
अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांना नंतरही अनेक त्रास होत असल्याचे समोर आले आहे. त्यात काही वृद्धांना तर फायब्रोसिसच्या आजाराने ग्रासल्याने फुप्फुस निकामी होऊन प्राणही गमवावा लागल्याचे समोर आले. त्यामुळे शासन स्तरावरूनही पोस्ट कोविडचीही वेगळी ओपीडी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. हिंगोलीत आधी मनुष्यबळ नसल्याने यासाठी टाळाटाळ केली जात हाेती. त्यानंतर जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनीही वेगळा वार्ड करण्यास सांगितले होते. मात्र अजूनतरी मोबाईलवरून संपर्क साधूनच रुग्णांच्या प्रकृतीची विचारणा केली जात असल्याचे सांगण्यात आले. मात्र जे रुग्ण गंभीर नव्हते. अशांनाही इतर काही त्रास झाला तरीही ते भीतीच्या सावटाखाली राहात आहेत. अशांनाही पोस्ट कोविड ओपीडी सुरू झाल्यास लाभ होऊ शकतो.
७७० जणांना उपचार
हिंगोली जिल्ह्यात साडेतीन हजार कोरोना रुग्ण आढळले. यापैकी ७७० जणांना दूरध्वनीवरून संपर्क साधून प्रकृतीची विचारपूस केली. काही गंभीर रुग्णांना थकवा, हाडे दुखणे, मांसपेशी दुखणे, दम लागणे, मानसिक भीती असा त्रास जाणवत आहे. त्यांना फिजिओथेरपी व इतर औषधोपचार दिले जात आहेत. चार ऑपरेटर यासाठी कार्यरत आहेत.
गंभीर त्रास नाही
पोस्ट कोविडमध्ये जिल्हा रुग्णालयाकडून काही दिवसांपूर्वीच यंत्रणा कामाला लावली आहे. या रुग्णांचे समुपदेशन केले जात आहे. त्यांना लक्षणानुसार आवश्यक उपचार सुचविला जात आहे. आतापर्यंत तरी कुणाला गंभीर त्रास झाल्याचे समोर आले नाही.
- डाॅ. गोपाल कदम,
वैद्यकीय अधिकारी