गोरक्षनाथाच्या ‘महापोळ्या’वर कोरोनाचे सावट; ३०० वर्षांच्या परंपरेत पडला खंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 19:47 IST2020-08-18T19:45:21+5:302020-08-18T19:47:49+5:30
वाई गोरक्षनाथ येथे गेल्या अनेक वर्षांपासून दरवर्षी पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी मंदिर समिती व गावकऱ्यांच्या सहकार्यातून ‘कर’ निमित्त महापोळा भरत असतो़

गोरक्षनाथाच्या ‘महापोळ्या’वर कोरोनाचे सावट; ३०० वर्षांच्या परंपरेत पडला खंड
- महेबूब खाँ पठाण
शिरडशहापूर : वसमत तालुक्यातील वाई गोरक्षनाथ येथे गेल्या ३०० वर्षांपासून दरवर्षी पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी ‘कर’ निमित्त ऐतिहासिक महापोळा भरत असतो़ गोरक्षनाथ देवस्थानला प्रदक्षिणा घालण्याकरिता परजिल्ह्यातून ५० ते ६० हजार बैलजोड्या येथे येतात. यंदा मात्र १९ आॅगस्ट रोजीचा नियोजित महापोळा कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटामुळे रद्द करण्यात आला आहे.
वाई गोरक्षनाथ येथे गेल्या अनेक वर्षांपासून दरवर्षी पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी मंदिर समिती व गावकऱ्यांच्या सहकार्यातून ‘कर’ निमित्त महापोळा भरत असतो़ या महोत्सवात नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येत बैलजोड्या येत असतात़ वाई गोरक्षनाथाचे दर्शन घेतल्यास बैलांना कोणतीच रोगराई होत नाही़, या श्रद्धेतून भाविक मोठ्या संख्येने बैलजोड्या घेऊन येत असतात़ महाराष्ट्रात केवळ वसमत तालुक्यातच ही ऐतिहासिक बैलांची यात्रा (महापोळा उत्सव) भरवली जाते़ वाई गोरक्षनाथ संस्थान व गावकऱ्यांच्या वतीने येणाऱ्या सर्व शेतकऱ्यांची जेवणाची मोफत व्यवस्था करण्यात येते.
तसेच जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाच्या वतीने बैलांची मोफत आरोग्य तपासणी व लसीकरण करण्यासाठी शिबिराचे आयोजन देखील केले जाते. यात्रेच्या पार्श्वभुमीवर होणारी विक्रमी गर्दी लक्षात घेऊन वसमत ते औंढा या महामार्गावरील वाहतूक बंद करून पर्यायी मार्गाने ती वळवण्यात येत असते़; परंतु यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे अनेक धार्मिक कार्यक्रम, उत्सव रद्द करण्यात आले आहेत़ कोरोनाच्या संकटामुळे सर्वत्र भितीचे वातावरण निर्माण झाले असून देवस्थान समितीचे पदाधिकारी व प्रतिष्ठीत नागरिकांनी बैठक घेऊन वाई गोरक्षनाथाचा महापोळा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरवर्षी महापोळ्यात मंदिर प्रदक्षणाकरीता हजारो बैलजोड्या याठिकाणी येतात. त्यामुळे पोळा सणानिमित्त मंदिर परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण होते. परंतु कोरोनाच्या संकटामुळे यंदा महापोळा रद्द करण्यात आला असून शासनाकडूनही तशा सूचना होत्या. यावर्षी पोळा भरविला जाणार नसल्यामुळे परंपरेला खंड पडला.