Corona Virus: 'Let us go home'; Hundreds of Rajasthani laborers suddenly came out on the streets to create confusion | Corona Virus : 'आम्हाला घरी जाऊ द्या'; शेकडो राजस्थानी मजुर अचानक रस्त्यावर आल्याने उडाला गोंधळ

Corona Virus : 'आम्हाला घरी जाऊ द्या'; शेकडो राजस्थानी मजुर अचानक रस्त्यावर आल्याने उडाला गोंधळ

हिंगोली : राजस्थान येथील शेकडो नागरिक सध्या प्रशासनाच्या देखरेखीत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सीमाबंदी असतानाही हैदराबादपासून हिंगोलीच्या कनेरगाव नाक्यापर्यंत आलेल्या या मजुरांना वाशिम पोलिसांनी जिल्ह्यात प्रवेश देण्यास मनाई केल्याने ते अडकून पडले होते. त्यांना हिंगोलीत आणल्यानंतर लिंबाळा परिसरातील शासकीय तंत्रनिकेतन येथे राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली आहे. परंतु आम्हाला आमच्या गावी जायचे आहे, असा आग्रह हे नागरिक करीत आहेत. २९ मार्च रोजी हे सर्व नागरिक अचानक रस्त्यावर आल्याने गोंधळ उडाला होता.

त्यामुळे लिंबाळा परिसरातील नागरिकांना यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. हे ३९६ राजस्थानी मजुर कामाच्या शोधात राजस्थानमधून स्थलांतरित झाले होते. या मजुरांनी सात ते आठ ट्रकद्वारे हैदराबादपासून हिंगोली तालुक्यातील कनेरगाव नाकापर्यंत अंतर कापले. परंतु वाशिम पोलिसांनी त्यांना प्रवेशबंदी असल्याचे कारण सांगून माघारी फिरण्यास सांगितले. त्यामुळे हे ट्रक पुन्हा कनेरगाव नाका चेक पोस्टवर आले. या सर्व मजुरांना प्रशासनाने ताब्यात घेतले. परंतु या मजुरांना आता ठेवायचे तरी कोेठे असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यानंतर हिंगोली शहरालगतच्या लिंबाळा मक्ता परिसरातील शासकीय तंत्रनिकेतन येथे या शेकडो मजुरांच्या भोजनाची व राहण्यची सुविधा करण्यात आली. परंतु हे नागरिक आता गावाकडे जायचे आहे, असे सांगत गर्दी करीत असल्याने प्रश्न गंभीर बनला आहे.

या प्रकारामुळे पोलीस यंत्रणेलाही नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे दिसून येत आहे. या नागरिकांना भोजन व सुविधा उपलब्ध करून दिल्या तरी त्यांनी रविवारी गोंधळ घातल्याने लिंबाळा गावातील नागरिकांना तसेच पोलिसांनाही त्रास सहन करावा लागला. वारंवार गोंधळ घालत हा मजुरवर्ग रस्त्यावर येत असल्याचे दिसून येत आहे.

राजस्थान येथील ३९६ मजुर प्रशासनाच्या देखरेखीत आहेत, त्यांना कुठलाही आजार नाही. ते आमच्या गावी जायचे आहेत, असे म्हणत आहेत. परंतु सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमिवर संचारबंदीचे आदेश लागू असल्याने ते शक्य नाही. त्यांच्या भोजनाची व राहण्याची सुविधा केली असली तरी, त्यातील काही मजुर गावी जायच आहे असा आग्रह करीत आहेत. या सर्व नागरिकांची दरदिवशी भेट घेऊन त्यांना समजावून सांगण्यात येत आहे. लिंबाळा मक्ता परिसरातील नागरिकांनीही घराबाहेर पडू नये शिवाय सर्वांनीच प्रशासनास सहकार्य करावे व आरोग्याची काळजी घ्यावी. - अतुल चोरमारे, पविभागीय अधिकारी हिंगोली

Web Title: Corona Virus: 'Let us go home'; Hundreds of Rajasthani laborers suddenly came out on the streets to create confusion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.