Corona Virus In Hingoli : हिंगोलीत पुन्हा एक संशयित रुग्ण; स्वॅब नमुने पुण्यास पाठवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 18:44 IST2020-03-27T18:43:35+5:302020-03-27T18:44:44+5:30
संशयित 30 वर्षीय डॉक्टर अकोल्यात आहे कार्यरत

Corona Virus In Hingoli : हिंगोलीत पुन्हा एक संशयित रुग्ण; स्वॅब नमुने पुण्यास पाठवले
हिंगोली : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात आयसोलेशन वार्डमध्ये कोरोनाचा एक संशयित रुग्ण दाखल झाला आहे. सदरील व्यक्ती ही डॉक्टर असून अंदाजे वय ३० वर्षे आहे. सदर व्यक्ती अकोला येथे कार्यरत असून हिंगोली येथील रहिवाशी आहेत.
सदरील डॉक्टरला २४ मार्चपासून सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे आहेत. संशयित डॉक्टर यांना आयसीएमआरच्या मार्गदर्शन सूचनेप्रमाणे आयसोलेशन वार्डमध्ये भरती केले आहे. त्यांचा थ्रोट स्वॅब नमुने पूणे येथील एनआयव्ही संस्थेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. दोन दिवसांमध्ये त्याचा अहवाल येणे अपेक्षीत असल्याचे जिल्हा रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे. संशयित रुग्णावर जिल्हा रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीममार्फत आयसोलेशन वार्डमध्ये उपचाराखाली ठेवले आहे.
१० जण होम क्वॉरनटाईन
हिंगोली जिल्ह्यात परदेशातून आलेल्या १० जणांना होम क्वॉरनटाईन (घरात अलगीकरण) करण्यात आले. यामध्ये तिघेजण फिलीपीन्स या देशातून आलेले आहेत. तर दोघे आॅस्ट्रेलिया, एक कझाकीस्तान, एक सौदेआरबीया, एक जर्मनी, दोन मालदिव या देशातून आले आहेत. त्यामुळे नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोरोनाशी लढा देण्यासाठी कोणीही घराबाहेर पडू नये, सर्वांनी घरीच थांबावे व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.