Corona Virus In Hingoli : राजस्थानला जाणारे 300 मजूर हिंगोली-वाशीम चेकपोस्टवर अडकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 19:31 IST2020-03-27T19:30:47+5:302020-03-27T19:31:55+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सीमाबंदी असताना हैदराबादपासून हिंगोलीच्या कनेरगाव नाक्यापर्यंत आलेल्या या मजुरांना वाशिम पोलिसांनी जिल्ह्यात प्रवेश देण्यास मनाई केल्याने अडचण झाली आहे.

Corona Virus In Hingoli : राजस्थानला जाणारे 300 मजूर हिंगोली-वाशीम चेकपोस्टवर अडकले
कनेरगाव नाका (जि. हिंगोली) : कामाच्या शोधात हैदराबादला गेलेल्या राजस्थानच्या मजुरांचे एक-दोन नव्हे, तब्बल आठ ट्रक कनेरगाव नाका सीमेवर अडकून पडले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सीमाबंदी असताना हैदराबादपासून हिंगोलीच्या कनेरगाव नाक्यापर्यंत आलेल्या या मजुरांना वाशिम पोलिसांनी जिल्ह्यात प्रवेश देण्यास मनाई केल्याने अडचण झाली आहे.
जवळपास तीनशे ते साडेतीनशे मजुरांची आरोग्य तपासणी करण्याचे काम सुरू केले आहे. ठणठणीत असल्याने सायंकाळी उशिरा जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी वाशिम प्रशासनाशी चर्चा केल्यानंतर त्यांची पुढे रवानगी केली.कामाच्या शोधात राजस्थानमधून मजूर देशाच्या विविध भागात स्थलांतरित होतात. राजस्थानच्या या मजुरांनी सात ते आठ ट्रकद्वारे हैदराबादपासून हिंगोली तालुक्यातील कनेरगाव नाका येथपर्यंतचे अंतर कापले. त्यांना मध्ये कोणी सीमाबंदीतही अडविले नाही म्हणून की, पर्यायी मार्ग शोधून ते इथपर्यंत आले हे कळायला मार्ग नाही. या ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्याने पोलिसांनी त्यांना अडविले होते. त्यातही आधी एक, मग दुसरा असे सात ते आठ ट्रक दुपारपर्यंत दाखल झाले. त्यामुळे एवढ्या लोकांना कसे ठेवायचे म्हणून पोलिसांनी त्यांना पुढे जाण्यास सांगितले. तर वाशिम पोलिसांनी त्यांना प्रवेशबंदी असल्याचे कारण सांगून माघारी फिरण्यास सांगितले. त्यामुळे हे ट्रक पुन्हा कनेरगाव नाका चेक पोस्टवर आले आहेत. या ठिकाणी ट्रकधील सर्व मजूर खाली उतरविण्यात आले व त्यांना बाजूला एका ठिकाणी बसविले.
या घटनेची माहिती गोरेगाव येथील ठाणेदारास कळविली. ठाणेदार श्रीमनवार येथे दाखल झाले आहेत. त्याचबरोबर डॉ.नामदेव कोरडे हे आरोग्य पथकासह तपासणी करीत आहेत. तलाठी चौधरीही येथे दाखल झाले. अतिरिक्त पोलीस अधीक्षक यशवंत काळे हे घटनास्थळी ठाण मांडून आहेत. दुपारी एक वाजेपासून ते सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत तपासणी संपली नव्हती.ठेवायचे कोठे?या लोकांना आता ठेवायचे कोठे हा प्रश्न निर्माण झाला होता. गावातील शाळेत व्यवस्था करण्यास ग्रामस्थही तयार नव्हते. या सर्वांची प्रकृती ठणठणीत असल्याने त्यांना तसेच पुढे पाठवण्यासाठी जिल्हाधिकाºयांनी वाशिम येथील प्रशासनाशी चर्चा केली. त्यानंतर ही मंडळी पुढे मार्गस्थ झाली.