कोरोना तपासणी व उपाययोजना प्रभावीपणे राबवावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:27 IST2021-03-15T04:27:39+5:302021-03-15T04:27:39+5:30
हिंगोली : जिल्ह्यात बाधित रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून कोरोनाच्या अनुषंगाने कॉन्टॅक्ट ...

कोरोना तपासणी व उपाययोजना प्रभावीपणे राबवावी
हिंगोली : जिल्ह्यात बाधित रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून कोरोनाच्या अनुषंगाने कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणे, कोरोना चाचण्या वाढविणे, कंटेन्मेंट झोन करून पुढील कार्यवाही करणे, बसस्थानक, रेल्वेस्थानकावर प्रवाशांची तपासणी करणे अशा सूचना जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिल्या आहेत.
जिल्ह्यात कोरोना रुग्ण आढळून आल्यास कंटेन्मेंट झोन करण्यात येतो. त्यानुसार कंटेन्मेंट झोनमधील सर्व नागरिकांची कोरोना चाचणी अनिवार्य करण्यात यावी यामध्ये कोरोनाची लक्षण आढळलेल्या नागरिकांची कोरोना आरटीपीसीआर चाचणी करण्यात यावी व लक्षणे नसलेल्या नागरिकांची कोरोना अँटिजेन चाचणी करण्यात यावी. जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयामधील बाह्यरुग्ण विभागामध्ये येणाऱ्या, शासकीय रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागामध्ये येणाऱ्या रुग्णांची कोरोना चाचणी अनिवार्य करण्यात यावी. यामध्ये कोरोना लक्षण आढळलेल्या नागरिकांची कोरोना आरटीपीसीआर चाचणी करण्यात यावी व लक्षणे नसलेल्या नागरिकांची कोरोना अँटिजेन चाचणी करावी, जर एखाद्या शासकीय रुग्णालयात बाह्यरुग्ण विभागामध्ये येणाऱ्या रुग्णांची कोरोना चाचणी होत नसल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्यात येईल, अशी सूचना जिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
पथक स्थापन करण्याचे आवाहन
कोरोना रुग्ण आढळल्यास त्यांच्या संपर्कातील नागरिकांची कॉन्टॅक्ट ट्रेसिंग प्रक्रिया करण्यात येते. परंतु, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग प्रक्रिया प्रभावीपणे राबविण्यासाठी तहसीलदारांनी तालुका पातळीवर कॉन्टॅक्ट ट्रेसिंग पथक नेमावे, या पथकामध्ये आरोग्य विभागातील एक सदस्य, पं. विभागातील एक सदस्य, नगर परिषद, नगर पंचायत विभागातील एक सदस्य, पोलीस विभागातील एक सदस्यानुसार पथक स्थापन करावे. यासाठी भाडे तत्त्वावर एका वाहनाची व्यवस्था तहसीलदारांमार्फत करण्यात यावी. पथकाने आरोग्य विभाग व तहसीलदारांच्या आदेशानुसार कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करावी.
३० कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणे अनिवार्य
शासन स्तरावरील सूचनानुसार एका कोरोना रुग्णामागे ३० कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणे अनिवार्य असल्याने संबंधित तहसीलदारांनी ३० कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यासाठी आरोग्य विभाग, वैद्यकीय अधीक्षक, नगर परिषद, नगर पंचायत आणि गटविकास अधिकारी यांच्याशी समन्वय साधावा. कोरोनाच्या अनुषंगाने कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यात आलेल्या सर्व नागरिकांना अनिवार्यपणे शासकीय केंद्रात विलगीकरण करण्यात यावे, विलगीकरण केंद्रातील सर्व सोयीसुविधा करण्यासाठी तहसीलदारांमार्फत नियोजन करावे, आवश्यकतेनुसार सोयी-सुविधांसाठी तहसीलदारांनी स्थानिक प्रशासनाचे सहकार्य घ्यावे. आरोग्य विभागामार्फत बसस्थानक, रेल्वेस्थानकावर येणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी अनिवार्यपणे करण्यात यावी, कोरोना रुग्ण आढळल्यास उपचाराच्या अनुषंगाने कार्यवाही करावी, असे जिल्हाधिकारी जयवंशी यांनी आदेशात म्हटले आहे.