सततचे भूकंप! वसमत तालुक्यात ७ दिवसांत दुसरा धक्का; गावांमध्ये भीतीचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 17:52 IST2025-10-25T17:52:20+5:302025-10-25T17:52:47+5:30
गेल्या सात वर्षांपासून जिल्ह्यातील वसमत, कळमनुरी आणि औंढा नागनाथ या तीन तालुक्यांना वारंवार भूकंपाचे धक्के बसत आहेत.

सततचे भूकंप! वसमत तालुक्यात ७ दिवसांत दुसरा धक्का; गावांमध्ये भीतीचे वातावरण
- इस्माईल जहागिरदार
वसमत (हिंगोली) : हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात शनिवार, २५ ऑक्टोबर रोजी दुपारी पुन्हा भूकंपाचा जोरदार धक्का जाणवला. दुपारी ३ वाजून ३७ मिनिटांनी हा भूकंपाचा अनुभव आला, ज्यात भूगर्भातून मोठा आवाज येऊन जमीन हादरली. तालुक्यात सलग दुसऱ्यांदा भूकंपाचा अनुभव आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
७ वर्षांपासून भूकंपाचे सत्र:
गेल्या सात वर्षांपासून जिल्ह्यातील वसमत, कळमनुरी आणि औंढा नागनाथ या तीन तालुक्यांना वारंवार भूकंपाचे धक्के बसत आहेत. यापूर्वी १८ ऑक्टोबर रोजी वसमत तालुक्याला धक्का बसला होता आणि त्यानंतर अवघ्या सात दिवसांनी, २५ ऑक्टोबर रोजी पुन्हा हा हादरा बसला.
या गावांना बसला हादरा:
दुपारी ३.३७ मिनिटांच्या सुमारास वसमत तालुक्यातील कुरुंदा, गिरगाव, खाजमापूरवाडी, सेलु, आंबा, चौंडी, पांगरा शिंदे यासह अनेक गावांमध्ये भूकंपाचा अनुभव आल्यामुळे नागरिक धास्तावले आहेत. वसमत, औंढा नागनाथ आणि कळमनुरी या तिन्ही तालुक्यांमध्ये हे भूकंपाचे धक्के सातत्याने जाणवत आहेत.
नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण:
यापूर्वी गतवर्षी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात तालुक्यात भूकंपाचे धक्के नोंदवले गेले होते. काही महिन्यांच्या विश्रांतीनंतर पुन्हा भूकंपाचे हादरे जाणवल्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेची भावना निर्माण झाली आहे. सुदैवाने, या भूकंपाच्या धक्क्यामुळे कोणतीही जीवित अथवा वित्त हानी झाल्याचे वृत्त नाही, मात्र वारंवार होणाऱ्या या भूकंपाच्या घटनांमुळे नागरिक मोठ्या प्रमाणावर धास्तावले आहेत. प्रशासनाने यावर तातडीने लक्ष देऊन या भूकंपांच्या कारणांचा शोध घ्यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
मालेगाव परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का; तीव्रता ३.९० रिश्टर स्केल
दरम्यान, नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील मालेगाव, धामधरी आणि देलुब या गावांमध्ये दिनांक २५ ऑक्टोबर, शनिवार रोजी दुपारी ३ वाजून ३६ मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ३.९० इतकी नोंदवली गेली आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात होता. मालेगाव परिसरातील काही गावे हिंगोली जिल्ह्याच्या सीमेला लागून असल्यामुळे या भागात भूकंपाचे धक्के जाणवले. या घटनेमुळे कोणतीही हानी झाल्याचे वृत्त नाही, मात्र नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.