- इस्माईल जहागीरदार
वसमत: तालुक्यातील कोर्टा पाटी येथे दिवसाढवळ्या एका धाडसी लुटीची घटना घडली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेची १० लाख रुपयांची रोकड घेऊन जाणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या दुचाकीला धडक देऊन चोरट्यांनी पैशांची बॅग पळवली. मात्र, पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन संशयितांना पुयणी येथील ग्रामस्थांनी शिताफीने पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
शुक्रवारी, ९ जानेवारी रोजी सकाळी १०:४५ च्या सुमारास जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्मचारी वसमत शहरातून १० लाख रुपयांची रोकड घेऊन 'आंबा चौंडी' शाखेकडे दुचाकीवरून जात होते. कर्मचारी कोर्टापाटीजवळ पोहोचले असता, पाठीमागून आलेल्या एका अज्ञात दुचाकीने त्यांच्या गाडीला जोराची धडक दिली. या धडकेमुळे कर्मचारी रस्त्यावर कोसळले. कर्मचारी सावरण्यापूर्वीच, पाठोपाठ आलेल्या दुसऱ्या दुचाकीवरील दोघांनी त्यांच्याजवळील १० लाख रुपये असलेली बॅग हिसकावून घेतली आणि वेगाने पळ काढला. या धाडसी चोरीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
ग्रामस्थांची सतर्कता आणि थरारक पाठलागघटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी धावपळ सुरू केली. चोरटे स्पोर्ट दुचाकीवरून पुयणी गावाच्या दिशेने जात असताना, तिथल्या ग्रामस्थांनी संशयावरून त्यांना अडवले. ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे दोन संशयित दुचाकीसह पकडले गेले. नागरिकांनी तात्काळ कुरुंदा पोलिसांना पाचारण करून या दोघांना त्यांच्या ताब्यात दिले.
पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह?भरदिवसा मुख्य रस्त्यावर 'सिनेस्टाईल' लूट झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. विशेष म्हणजे, घटनेची माहिती नागरिकांनी तात्काळ देऊनही पोलीस वेळेवर घटनास्थळी पोहोचले नाहीत, असा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. पोलिसांची तपासाची गती संथ असल्याबद्दल नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
तपास सुरू...या प्रकरणाचा तपास कुरुंदा पोलीस करत आहेत. पकडण्यात आलेले तरुण खरंच या लुटीत सामील आहेत का? आणि यामागे मोठी टोळी आहे का? याचा शोध पोलीस घेत आहेत. उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
Web Summary : In Wasmat, thieves ambushed bank employees, stealing ₹10 lakhs. Villagers apprehended two suspects attempting to flee. Locals criticized slow police response. Investigation ongoing.
Web Summary : वसमत में, चोरों ने बैंक कर्मचारियों पर हमला कर ₹10 लाख चुरा लिए। ग्रामीणों ने भागने की कोशिश कर रहे दो संदिग्धों को पकड़ा। स्थानीय लोगों ने पुलिस की धीमी प्रतिक्रिया की आलोचना की। जांच जारी है।