विसर्जनाच्या दिवशी वैजापूरमध्ये गणेश मंडळातर्फे चूलबंद औतन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2023 20:29 IST2023-09-28T20:28:37+5:302023-09-28T20:29:24+5:30
गणेशाला पुरीभाजीचा दाखवला जातो नैवेद्य

विसर्जनाच्या दिवशी वैजापूरमध्ये गणेश मंडळातर्फे चूलबंद औतन
- बापूराव इंगोले
नर्सी नामदेव ( जि.हिंगोली): लोकमान्य टिळक यांना अपेक्षित असणारा सार्वजनिक गणेशोत्सव अनेक वर्षांपासून नर्सी ( नामदेव) जवळ असलेल्या वैजापूर गावी साजरा होत आहे. दहा दिवस गणेशोत्सव साजरा केल्यानंतर वैजापूर येथे 'एक गाव एक गणपती' मंडळातर्फे गावातील लहानमोठ्यांना जेवायला बोलावले जाते. 'एक गाव एक गाव एक गणपती' निमित्त गावातील एकही चूल पेटत नाही.
गणेशोत्सव हा सण दहा दिवस सर्वत्र मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.
हिंगोली तालुक्यातील वैजापूर येथील ग्रामस्थांनी देखील मागील अनेक वर्षापासून चालत आलेली वेगवेगळ्या गणेश मंडळाची स्थापना करण्याची परंपरा मोडीत काढत ग्रामस्थांच्या पुढाकारातून येथील वैजनाथगड महादेव मंदिर येथे एका गणपतीची स्थापना करुन गणेशोत्सव साजरा केला.
दहा दिवस असणाऱ्या गणेशोत्सवामध्ये या ठिकाणी दररोज गणेश भक्तांकडून आरती, भजन, कीर्तन, प्रवचन, त्याचबरोबर शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आले. अनंत चतुर्दशीच्या दिवशी वैजापूर गावी एकाही घराची चूल पेटवली जात नाही. विशेष म्हणजे ग्रामस्थ व महिला स्वतः हाताने भोजन तयार करून सर्व ग्रामस्थांना पुरीभाजीच्या महाप्रसादाचे वाटप केले जाते.
त्यांनतर सायंकाळच्या सुमारास गणपती बाप्पाचे वाजतगाजत 'गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर' या अशा घोषणा देत मिरवणूक काढून येथील तलावात विसर्जन करुन भावपूर्ण निरोप दिला जातो.