हिंगोलीत पालकमंत्री दिलीप कांबळे यांना दाखवले काळे झेंडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 19:34 IST2018-12-24T19:23:31+5:302018-12-24T19:34:18+5:30
आढावा बैठक आटोपून ते मार्गस्थ होत असताना भारिपच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्याच्या विरोधात घोषणाबाजी करण्यास सुरूवात केली.

हिंगोलीत पालकमंत्री दिलीप कांबळे यांना दाखवले काळे झेंडे
हिंगोली : भारिप-बहुजन महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी आज सायंकाळी ५.३० वाजता पालकमंत्री दिलीप कांबळे यांना काळे झेंडे दाखवून निषेध केला. पालकमंत्री कांबळे आज जिल्हा दौऱ्यावर आले होते. शहरातील शासकीय विश्रामगृह येथे आढावा बैठक आटोपून ते मार्गस्थ होत असताना भारिपच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्याच्या विरोधात घोषणाबाजी करण्यास सुरूवात केली.
भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांचे नक्षलवाद्यांसोबत संबंध असल्याचे विधान पालकमंत्री कांबळे यांनी केले होते. या विधानाच्या निषेधार्थ संतप्त भारिपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले. यावेळी त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. काही आंदोलकांना पोलीसांनी ताब्यात घेतले.
यावेळी पक्षनिरीक्षक रविंद्र मोरे पाटील, जिल्हाध्यक्ष वसीम देशमुख, जिल्हा मुख्यसंघटक रविंद्र वाढे, युवा जिल्हाध्यक्ष ज्योतीपाल रणवीर, रिपब्लिकन सेनेचे किरण घोंगडे, रघुवीर हानवते, अतीकुर रहेमान, बबन भूक्तर, डॉ.वाघमारे, वर्षा मोरे, सुनंदा वाघमारे, सोमनाथ शेळके, रूपेश कदम यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.