'खबरदार...मी आमदाराचा नातलग आहे'; प्लास्टिक जप्ती मोहिमेत मुख्याधिकाऱ्यांसोबत अरेरावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 20:30 IST2020-02-27T20:30:37+5:302020-02-27T20:30:58+5:30
विनाकारण तुम्हाला प्लास्टिक जप्त करण्याचा अधिकार कोणी दिला ?

'खबरदार...मी आमदाराचा नातलग आहे'; प्लास्टिक जप्ती मोहिमेत मुख्याधिकाऱ्यांसोबत अरेरावी
हिंगोली : ‘मी आमदाराचा नातलग आहे, विनाकारण तुम्हाला प्लास्टिक जप्त करण्याचा अधिकार कोणी दिला’ असे म्हणत हिंगोली न. प. चे मुख्याधिकारी रामदास पाटील यांच्यासोबत तसेच पालिकेच्या इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत अरेरावी करणाऱ्यावर गुरुवारी ( दि. २७) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिंगोली नगरपालिकेच्या वतीने मागील काही दिवसांपासून शहरात प्लास्टिक बंदी मोहीमे अंतर्गत धडक कारवाया केल्या जात आहेत. शहरातील काबरानगर येथील शुभमंगल साडी व रेडिमेड कापड दुकानावर नगरपालिकेच्या पथकाने २५ फेबु्रवारी रोजी धडक कारवाई करून २२ किलो प्लास्टिकसाठा जप्त केला. शुभमंगल कापड दुकानावरील ही दुसरी कारवाई होती.
यावेळी पालिकेचे कर्मचारी कारवाई करत असताना दुकानचालक पुरूषोत्तम अग्रवाल आणि गोविंद भवर यांनी कर्मचाऱ्यांची दमदाटी केली. त्यामुळे पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी रामदास पाटील यांना कळविले. काही वेळातच पाटील हे कारवाईच्या ठिकाणी पोहचले व अग्रवाल यांच्याशी बोलत होते. यावेळी मुख्याधिकाऱ्यांनी कारवाईत अडथळा करणारी संबंधित व्यक्ती कोण आहे, अशी विचारणा केली असता, तितक्यात गोविंद भवर हे घटनास्थळी आले व मुख्याधिकारी रामदास पाटील यांच्यासोबत अरेरावी करत शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तसेच तुम्हाला प्लास्टिक बंदीचा अधिकार कोणी दिला असे म्हणत कामात अडथळा केला. त्यानंतर अपंगात्वाचे अवहेलना करणारा मजकूर सोशल मिडीयावर गोविंद भवर यांनी प्रसिद्ध केला. त्यामुळे याप्रकरणी मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विविध कलमानुसार हिंगोली शहर ठाण्यात त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.