Aundha nagarpanchayat Forget about the Marathwada Mukti Sangam Memorial; Flowers are decorated with greetings by sellers | मराठवाडा मुक्तिसंग्राम स्मृतीस्तंभाचा औंढा नगरपंचायतला विसर; फुलविक्रेत्यांनी सजावट करून केले अभिवादन

मराठवाडा मुक्तिसंग्राम स्मृतीस्तंभाचा औंढा नगरपंचायतला विसर; फुलविक्रेत्यांनी सजावट करून केले अभिवादन

ठळक मुद्दे प्रशासनाने उडवा-उडवीची उत्तरे दिली.

औंढा नागनाथ (जि.हिंगोली): येथील मराठवाडा मुक्ती संग्रामात सहभाग घेऊन हुतात्मा झालेल्या २१ स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मृती स्तंभास १७ सप्टेंबर रोजी अभिवादन करण्याऐवजी त्यांचा सन्मान केला नसल्याची तक्रार हुतात्म्याचे नातेवाईकांनी करून संताप व्यक्त केला आहे. या उलट या स्तंभास फुलविक्री करणाऱ्यांनीच फुले वाहून अभिवादन केल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी घडला आहे.

स्मृतीस्तंभास स्वातंत्र्यदिनी, प्रजासत्ताक दिनी व मराठवाडा मुक्तिसंग्राम या दिवशी अभिवादन केले जाते; परंतु सध्या औंढा येथील स्मृतिस्तंभाचा नगरपंचायत प्रशासनास मागील दोन वर्षांपासून विसर पडला असून १७ सप्टेंबर रोजी श्रद्धांजली वाहण्यात आली नाही. हा स्मृती स्तंभ औंढा- हिंगोली या महामार्ग लगतच्या मुख्य रस्त्यावर आहे. काही वर्षांपूर्वी याच ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करून हौतात्म्य पत्करलेल्या २१ कुटुंबियांचा ग्रामपंचायतकडून सत्कारही केला जात असे; परंतु आता नगरपंचायत झाली अन् पूर्वीसारखा सत्कार समारंभ होत नाही. त्यामुळे स्वातंत्र्यसैनिकांच्या नातेवाईकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. याबाबत हुतात्मा गणपत ऋषी यांचे नातू कृष्णा ऋषी यांनी नगरपंचायत गाठून जाब विचारला आहे; परंतु प्रशासनाने उडवा-उडवीची उत्तरे दिली. नगराध्यक्षा व मुख्याधिकारी यांच्यामध्ये समन्वय राहिला नसल्याचे दिसून येत आहे. नगरपंचायतीकडून स्मृतीस्तंभाच्या ठिकाणी श्रद्धांजली वाहिली नसल्याची चर्चा आहे. 

फुलविक्रेत्यांनीच केली स्तंभाची सजावट  
विशेष म्हणजे स्तंभ परिसरात फुलांची विक्री करणाऱ्या मुस्लिम समाजातील फुल विक्रेत्यांनी हा स्तंभ फुलांनी सजवून अभिवादन केले. आज १७ सप्टेंबरच्या दिवशी त्यांनी हौतात्म्यांचे स्मरण केले.
 
मुख्याधिकारी म्हणतात आम्हीही केलं अभिवादन 
याबाबत नगरपंचायतचे मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांना विचारले असता त्यांनी हुतात्म्यांना अभिवादन करण्याची सर्वच यंत्रणेची जबाबदारी आहे. आम्ही व नगराध्यक्ष सविता चौंढेकर यांनी सकाळी  जाऊन या स्तंभाला अभिवादन केले आहे. मात्र या स्तंभाच्या रंगरंगोटीचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग करते. त्यामुळे त्यांनी रंगरंगोटी का केली नाही, हे सांगता येणार नाही.

Web Title: Aundha nagarpanchayat Forget about the Marathwada Mukti Sangam Memorial; Flowers are decorated with greetings by sellers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.