चारचाकीसोबतच ८ दुचाकींवरुनही चालतो आरोग्य विभागाचा कारभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:21 IST2020-12-27T04:21:58+5:302020-12-27T04:21:58+5:30
हिंगोली : ग्रामीण आरोग्य विभागाला चारचाकी वाहनांची अपुरी संख्या कायम सतावत असते. आरोग्य विभागाच्या विविध योजनांसाठी डॉक्टरांना व कर्मचाऱ्यांना ...

चारचाकीसोबतच ८ दुचाकींवरुनही चालतो आरोग्य विभागाचा कारभार
हिंगोली : ग्रामीण आरोग्य विभागाला चारचाकी वाहनांची अपुरी संख्या कायम सतावत असते. आरोग्य विभागाच्या विविध योजनांसाठी डॉक्टरांना व कर्मचाऱ्यांना स्वत:च्या वाहनांनी जाण्याची वेळ येते. त्यातच आता क्षयरोग विभागाला ८ दुचाकी केंद्र शासनाकडून मिळाल्या असून त्यावरून पर्यवेक्षकीय यंत्रणा काम करते.
हिंगोली जिल्ह्यात आरोग्य विभागाकडे प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राला १ याप्रमाणे २४ रुग्णवाहिका आहेत. मात्र, यातील सात ते आठ कायम नादुरुस्त राहतात. त्यामुळे त्याचा ताण इतर आरोग्य केंद्रांच्या वाहनांवर पडतो. काहीवेळा तर दोन्हींकडील वाहन न मिळाल्याने रुग्णांची मोठी अडचण होते. अशावेळी १०८ अथवा १०२ वर संपर्क करावा लागतो. त्यातही प्रतिसाद मिळेलच की नाही, हे सांगता येत नाही. इतर ४ ते ५ वाहने ही आरोग्य विभागाच्या प्रशासकीय कामासाठी आहेत. क्षयरोग विभागाला केंद्र शासनाने पर्यवेक्षकीय कामासाठी ८ ते ९ दुचाकी दिल्या आहेत. त्यावरून इतर कोणतीही कामे केली जात नाहीत. त्याही प्रशासकीय कामासाठी वापरल्या जात असल्यातच जमा आहेत. तरीही अप्रत्यक्षपणे त्यांचा रुग्णसेवा देण्यासाठी हातभार लागत असतो.
दुचाकीच्या माध्यमातून केली जाणारी कामे
जिल्हा परिषदेच्या क्षयरोग विभागाला केंद्र शासनाकडून ८ ते ९ दुचाकी देण्यात आल्या आहेत. या दुचाकीवरून पर्यवेक्षकीय यंत्रणा गावोगाव भेटी देत असते.
या दुचाकी वरिष्ठ उपचार पर्यवेक्षकांकडे आहेत. याद्वारे ही मंडळी गावोगाव जाऊन क्षयरोगसदृश्य रुण शोधण्याचे काम करतात.
चारचाकीतून केली जाणारी कामे
चारचाकी वाहनांतून रुग्णवाहिका असल्यास त्यातून ग्रामीण भागातील रुग्णांना वरिष्ठ आरोग्य संस्थेत पाठविण्याची व्यवस्था केली जाते. प्रसूतीसाठी आलेल्या महिलांना मोठा उपयोग होतो.
इतर चारचाकी वाहनांतून पर्यवेक्षकीय कामे अधिकारी व कर्मचाऱ्यांमार्फत केली जात असतात.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला दुचाकी मिळाल्या नाहीत. मात्र केंद्र शासनाने क्षयरोग विभागाला पर्यवेक्षक या पदासाठी ८ ते ९ दुचाकी गतवर्षी दिल्या आहेत. त्यावरून गावोगाव फिरून उपचार, स्वॅब घेणे आदी कामे केली जातात.
- डॉ. राहुल गिते, अधिकारी, जिल्हा परिषद.