वसमत (जि. हिंगोली) : उसने दिलेले एक हजार मागितल्यावरून दोघात वाद झाला. या वादातून शिवीगाळ करत जिवे मारण्याच्या उद्देशाने एकाच्या पोटात चाकू भोसकल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री ९ वाजेच्या दरम्यान घडली. जखमीस उपचारासाठी नांदेड येथे पाठवण्यात आले आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील चंदगव्हाण येथील इर्शाद शेख दाऊद (रा. चंदगव्हाण) याने शहरातील शेख असीम शेख कलीमोद्दीन बीडकर (रा. दर्गा मोहल्ला, वसमत) यास काही दिवसांपूर्वी एक हजार रुपये उसने दिले होते. उसने दिलेले पैसे इर्शादने असीम यास मागितले. यावरुन ८ जुलै रोजी रात्री ९ वाजेदरम्यान दोघांत वाद झाला. या वादातून असीमने इर्शाद यास शिवीगाळ करत चाकूने पोटावर वार केले. यात इर्शाद शेख हा गंभीर जखमी झाला. गंभीर जखमी इर्शाद यास नागरीकांनी उपचारासाठी शहरातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. परंतु प्रकृती गंभीर असल्याने त्यास पुढील उपचारासाठी नांदेड येथे पाठवण्यात आले आहे.
या घटनेची माहिती ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन बोराटे यांना कळताच घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याप्रकरणी गंभीर जखमी इर्शादचा भाऊ मौलाना शेख दाऊद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेख असीम बीडकर याच्याविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणाचा तपास सपोनि गजानन बोराटे, फौजदार एकनाथ डक, भगवान आडे,अजय पंडित करत आहेत.