अंगणवाडी सेविकांचा मोबाईल ‘हँग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:37 IST2021-01-08T05:37:27+5:302021-01-08T05:37:27+5:30

हिंगोली : शासनाने अंगणवाडीसेविकांना विविध प्रकारचे अहवाल लेखी तयार करून पाठविण्याच्या कामातून सुटका करण्यासाठी विशेष साॅफ्टवेअर विकसित करून सुविधा ...

Anganwadi worker's mobile 'hangs' | अंगणवाडी सेविकांचा मोबाईल ‘हँग’

अंगणवाडी सेविकांचा मोबाईल ‘हँग’

हिंगोली : शासनाने अंगणवाडीसेविकांना विविध प्रकारचे अहवाल लेखी तयार करून पाठविण्याच्या कामातून सुटका करण्यासाठी विशेष साॅफ्टवेअर विकसित करून सुविधा निर्माण करून दिली. मात्र, हे मोबाईलच हँग होत असल्याने ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही प्रणालींत काम करण्याची वेळ आली आहे.

हिंगोली जिल्ह्यातील सर्व १०८९ अंगणवाड्यांत मोबाईल दिले आहेत. सेविकांना त्यावरून विविध अहवाल पाठवावे लागतात. यासाठी या सेविकांना प्रशिक्षणही देण्यात आले. त्यानंतर काहीकाळ ही सेवा सुरळीत चालली. मात्र, आता हे मोबाईल हँग होत आहेत. अनेकांना तांत्रिक अडचण आली की कधी तालुक्याला तर कधी जिल्ह्याला मोबाईल पाठवावा लागतो. त्यानंतर ऑफलाईन केलेले काम पुन्हा ऑनलाईन करण्याची वेळ येत आहे. काही जणींना तर प्रशिक्षणात सांगितलेली माहिती नंतर लक्षात न राहिल्याने इतरांचा आधार घेवून मोबाईल हाताळावा लागतो. तशी हाताळणी करूनही मोबाईल हँग झाला तर अडचणींत भर पडत आहे. काहींचे मोबाईलच व्यवस्थित नसले तरीही एक वर्षाच्या वाॅरंटीत वारंवार दुरुस्ती करून काम भागविण्याचा प्रकार घडत असल्याचेही सांगितले जाते.

लिंकच चालत नसल्याने अडचण

कोरोनाच्या काळात लिंकच चालत नसल्याने अनेक अंगणवाडीसेविकांनी मोबाईलवर अपलोड केलेला डाटा ऑनलाईन झाला नाही. त्यामुळे पुन्हा ऑफलाईन करावा लागत आहे. ही अडचण अजून सुटली नाही.

मोबाईल तत्काळ दुरुस्त करून दिला जातो

ज्या अंगणवाडीसेविकांचा मोबाईल नादुरुस्त झाला त्यांना वाॅरंटीत लागलीच दुरुस्त करून मिळतो. फुटला अथवा इतर नुकसान झाले तर स्वत: भरून द्यावे लागते. चोरी झाली तर शासन भरून देते.

- गणेश वाघ,

महिला व बालकल्याण अधिकारी

मोबाईलवरुन कोणती सरकारी कामे करावी लागतात?

अंगणवाडीसेविकांना आपल्या अंगणवाडीतील प्रत्येक बालकाचे वजन व उंची मोजून ती ॲपवर भरावी लागते.

अंगणवाडीतील बालकांना पुरविण्यात येणाऱ्या पोषण आहाराविषयीची माहितीही विद्यार्थीनिहाय भरून द्यावी लागते.

गावातील सर्व गरोदर मातांच्या नोंदी घेवून त्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शनासाठी दिलेल्या गृहभेटींच्या नोंदी कराव्या लागतात.

स्तनदामाता व बाळाच्या आरोग्याची माहिती घेवून त्यात काही अडचणी असल्यास त्याच्या नोंदीही द्याव्या लागतात.

बाळाचे दर महिन्याचे लसीकरण केले अथवा नाही, याची माहिती घेवून त्याची माहितीही भरावी लागते.

गावातील कुटुंबांचे आधार अपडेट झाले की नाही व ते लिंक करून घेतली की नाही याची माहितीही भरावी लागते.

Web Title: Anganwadi worker's mobile 'hangs'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.