वसमत : वसमत ते औंढा नागनाथ मार्गावरील वाई फाट्याजवळ कार व दुचाकीचा रविवारी रात्री ९. ४० वाजता भीषण अपघात झाला. यात दुचाकीवरील शेख मोबीन शेख सलीम (वय २४), शेख आवेज शेख जावेद (वय २३, दोघे रा. बहिरोबाचोंडी) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
बहिरोबाचोंडी येथील शेख मोबीन शेख सलीम , शेख आवेज शेख जावेद हे बांधकाम मजुरीचे काम करत. रविवारी वसमत येथे दिवसभर मजुरीकरून दोघेही रात्री दुचाकीवर गावाकडे निघाले. वसमत ते औढानागनाथ मार्गावरील वाई फाट्याजवळ रात्री ९:४० वाजेदरम्यानात औंढा नागनाथकडून येणाऱ्या कारसोबत त्यांच्या दुचाकीची धडक झाली. या अपघातात दुचाकीवरील शेख मोबीन शेख सलीम (वय २४), शेख आवेज शेख जावेद (वय २३, दोघे रा. बहिरोबाचोंडी) यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताने मार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. माहिती मिळताच अपघातस्थळी सपोनि रामदास निरदोडे, भालेराव, संतोष पटवे आदींनी वाहतूक सुरळीत केली.
दरम्यान, अपघातस्थळ वाई फाटा हे दोन्ही मृत तरुणांचे गाव बहिरोबाचोंडी याच्या जवळ आहे. घर काही अंतरावर राहिले असताना अपघातात कर्त्या तरुणांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.