अनलॉकनंतर भाजीपाला ५० टक्क्यांनी महागला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:20 IST2021-06-22T04:20:43+5:302021-06-22T04:20:43+5:30

हिंगोली : फेब्रुवारी, मार्च, एप्रिल या तीन महिन्यांमध्ये कोरोना महामारीचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्यामुळे सर्वच ठिकाणची भाजीपाला ...

After unlock, vegetables became 50 per cent more expensive | अनलॉकनंतर भाजीपाला ५० टक्क्यांनी महागला

अनलॉकनंतर भाजीपाला ५० टक्क्यांनी महागला

हिंगोली : फेब्रुवारी, मार्च, एप्रिल या तीन महिन्यांमध्ये कोरोना महामारीचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्यामुळे सर्वच ठिकाणची भाजीपाला बाजारपेठ बंद होती. यादरम्यान, शेतकऱ्यांना भाजीपाला शहराच्या ठिकाणी नेता आला नाही. अनेक शेतकऱ्यांच्या भाजीपाल्यांची नासाडीही झाली. आता अनलॉकनंतर भाजीपाला पन्नास टक्क्यांनी महागल्याचे पहायला मिळत आहे.

हिंगोली शहरात जिल्ह्यातील वीस ते पंचवीस खेड्यांतून भाजीपाला विक्रीसाठी येतो. सकाळी शहरातील मुख्य भाजीपाला मार्केटमध्ये भाजीपाल्यांची विक्री होते. जिल्ह्यातील शेतकरी सकाळी सहा वाजेच्या सुमारास भाजीपाला टेम्पोद्वारे घेऊन येतात. यानंतर याठिकाणचे ठोक विक्रेते भाजीपाला शेतकऱ्यांकडून खरेदी करतात. त्यानंतर ते छोट्या विक्रेत्यांना विकतात. महागाईने कळस गाठला असून अनलॉकनंतर आता भाजीपाला महाग झाल्याचे पहायला मिळत आहे. जिल्ह्यात भाजीपाला मोठ्या प्रमाणात पिकविला जात असला तरी शेतकऱ्यांना म्हणावा तसा भाव मिळत नाही, असे काही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

सद्य:स्थितीत बाजारपेठेत चवळी ४० रुपये, वांगे ४० रुपये, शेवगा ६० रुपये, कारले ६०, भेंडी ३०, दोडका ३५ रुपये किलोप्रमाणे विकले गेल्याचे पहायला मिळाले. यावेळी ग्राहकांनी घासघीस केल्यानंतर भाजी विक्रेते भावही कमी करतात, असेही विक्रेत्यांनी सांगितले.

भाजीपाल्याचे दर

भाजीपाला १ जून २१ जून

टोमॅटो १० २५

हिरवी मिरची २० ४०

कोथिंबीर १० ३०

वांगे १५ ४०

कोबी १० ३०

म्हणून वाढले दर......दोन महिन्यांपूर्वी भाजीपाला मार्केट हे पूर्णत: बंदच होते. आजमितीस अनलॉक झाले असल्यामुळे भाजीपाला विक्रेत्यांनी भाजीपाला व्यवसाय पुन्हा सुरू केला आहे.

- शेख मुजीब, व्यापारी

ठोक विक्रेत्याकडून आम्ही भाजीपाला खरेदी करतो. काही भाज्यांची आवकही सध्या कमीच आहे. येत्या काही दिवसांत चांगला पाऊस पडला तर पालेभाज्यांची किंमत कमी होऊ शकेल.

- तुकाराम कोरडे, व्यापारी

शेतात भाजीपाला मोठ्या प्रमाणात पिकवतो; परंतु कोरोना महामारीमुळे शहराच्या ठिकाणी माल नेता येत नव्हता. आता अनलॉक झाले आहे. त्यामुळे भाजीपाला व्यवसायाला चांगला दिवस येतील, असे वाटते.

-देवीदास कोरडे, शेतकरी

सद्य:स्थितीत पाणी भरपूर आहे. सर्वत्र भाजीपाला पिकतो; परंतु कोरोनामुळे बहुतांशवेळा भाजीपाल्याची विक्री होत नाही. त्यामुळे नाईलाजाने शेतातील भाजीपाला शेतातच टाकून द्यावा लागतो. आता चांगला भाव मिळेल, अशी आशा आहे.

- रमेश कोरडे, शेतकरी

गेल्या काही दिवसांपासून भाजीपाला महाग झाला आहे. त्यामुळे रोजच आम्हाला वरण करावे लागत आहे. कधी घट्ट वरण तर कधी पातळ वरण फोडणी देऊन खातो.

-वंदना मुखमहाले, गृहिणी

महाईने कळस गाठला आहे. जीवनावश्यक वस्तूंबरोबर काही दिवसांपासून भाजीपालाही महाग झाला आहे. त्यामुळे वेगवेगळ्या डाळींचे वरण फोडणी देऊन खावे लागत आहे.

-यशोदा सुरुशे, गृहिणी

-

फोटो

Web Title: After unlock, vegetables became 50 per cent more expensive