सोडियम हायड्रोक्लोराईडची खरेदी योग्यच केल्याचा प्रशासनाचा दावा

By Admin | Updated: June 11, 2014 00:20 IST2014-06-11T00:12:59+5:302014-06-11T00:20:05+5:30

हिंगोली : जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाने सोडियम हायड्रोक्लोराईडची खरेदी शासकीय नियमानुसारच केल्याचा दावा केला

The administration claims to have purchased sodium hydrochloride right | सोडियम हायड्रोक्लोराईडची खरेदी योग्यच केल्याचा प्रशासनाचा दावा

सोडियम हायड्रोक्लोराईडची खरेदी योग्यच केल्याचा प्रशासनाचा दावा

हिंगोली : जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाने सोडियम हायड्रोक्लोराईडची खरेदी शासकीय नियमानुसारच केल्याचा दावा केला असून, यासाठी २००३ मध्ये काढण्यात आलेल्या शासकीय निर्णयाचा आधार घेण्यात आला आहे. याबाबतचा अहवाल राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे; परंतु याच शासन निर्णयात कमी खर्चात सोडियम हायड्रोक्लोराईड किंवा ब्लिचिंग पावडरची खरेदी करावी, या दिलेल्या नियमाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.
जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाने २०१३-१४ या वर्षाकरीता ग्रामीण भागातील पिण्याचे पाणी शुद्ध करण्यासाठी ब्लिचिंग पावडर खरेदी करण्यासाठी ७ लाख रुपयांची तरतूद केली होती. या निधीमधून कमी किंमत असलेले ब्लिचिंग पावडर खरेदी करण्याऐवजी महागडे सोडियम हायड्रोक्लोराईड खरेदी करण्यात आले. परिणामी जिल्हा परिषदेला नुकसान सहन करावे लागले. ही बाब माहिती अधिकारांतर्गत उघड झाली. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ ने प्रसिद्ध केल्यानंतर विभागीय आयुक्त कार्यालयाने व राज्याच्या पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्रालयाने जिल्हा प्रशासनाला याबाबत खरेदीचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. त्यानुसार जिल्हा परिषद पंचायत विभागाने अवाल तयार केला असून, त्यामध्ये २००३ मध्ये या अनुषंगाने काढलेल्या शासन निर्णयाचा हवाला देण्यात आला आहे. त्यामध्ये नियमानुसारच सोडियम हायड्रोक्लोराईडची खरेदी केल्याचे नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे याच शासन निर्णयात कमी खर्चात सोडियम हायड्रोक्लोराईड किंवा ब्लिचिंग पावडर खरेदी करावी या टाकलेल्या अटीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. कमी किमतीमध्ये ब्लिचिंग पावडर मिळत असेल तर जास्त पैसे देऊन सोडियम हायड्रोक्लोराईड खरेदी करण्यात अधिकाऱ्यांना काय स्वारस्य होते? याचा खुलासा होणे आवश्यक आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने जो खुलासा शासनाकडे सादर केला असून, तो अत्यंत तकलादू आहे. त्यामुळे या प्रकरणी आता वरिष्ठ पातळीवरून काय कार्यवाही होते, याकडे लक्ष लागले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: The administration claims to have purchased sodium hydrochloride right