हिंगोली : जलसंधारण विभागाचे नवीन अपर आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे सुरू केले जाणार असून, राज्यात पालघर, सिंधूदुर्ग, वर्धा येथे या विभागाची कार्यालये सुरू केली जाणार आहेत, अशी माहिती मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी विधान परिषदेत दिली.
आमदार डॉ. प्रज्ञाताई सातव यांनी १ जुलै रोजी जलसंधारण विभागातील सुधारित आकृतीबंधाच्या अनुषंगाने लक्षवेधी उपस्थित केली होती. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली १८ जून २०२५ रोजी क्षेत्रिय उच्चस्तरीय समितीने आकृतीबंधास मान्यता दिली. मात्र, या बैठकीचे इतिवृत्त काढण्यास विलंब होत आहे. सुधारित आकृतीबंधाचा शासन निर्णय कधी निर्गमित केला जाईल आणि नवीन पदभरती कधीपर्यंत होईल, असा प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना मंत्री संजय राठोड यांनी सांगितले, जलसंधारण विभागात लवकरच ८,७६७ पदांची भरती होणार आहे. या पदांना उच्चस्तरीय समितीने मान्यता दिली आहे. उच्चस्तरीय बैठकीचे इतिवृत्त लवकरच मिळेल.
महत्त्वपूर्ण असलेल्या या विभागांचे नवीन अपर आयुक्त कार्यालय संभाजीनगर येथे सुरू केले जाईल. तसेच जिल्हास्तरावर स्वतंत्र जलसंधारण अधिकारी पदाची निर्मिती करण्यात येणार असून, पालघर, सिंधुदुर्ग, वर्धा जिल्ह्यात राज्यस्तरावरील नवीन तीन कार्यालये सुरू करणार आहोत. जिल्हा परिषदेअंतर्गत लातूर, सोलापूर, रत्नागिरी आणि रायगड येथे नवीन जिल्हा जलसंधारण अधिकारी कार्यालये सुरू करण्याची घोषणाही राठोड यांनी केली. जलसंधारण महामंडळाला सध्या दोन पदे उपलब्ध असून, त्यात वाढ करून २४ नवीन पदे मंजूर केली असल्याचेही त्यांनी सांगितले.