वाहतूक नियमांचे उल्लंघनप्रकरणी कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:38 IST2021-01-08T05:38:13+5:302021-01-08T05:38:13+5:30
नाल्यावर धूर फवारणीची मागणी हिंगोली : शहरातील जिजामातानगर, नाईकनगर, देवडानगर आदी भागांतील नाल्या साफ केल्या नसल्यामुळे डासांचे प्रमाण वाढले ...

वाहतूक नियमांचे उल्लंघनप्रकरणी कारवाई
नाल्यावर धूर फवारणीची मागणी
हिंगोली : शहरातील जिजामातानगर, नाईकनगर, देवडानगर आदी भागांतील नाल्या साफ केल्या नसल्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाने याची दखल घेवून नाल्यावर औषधांची फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
दिशादर्शक फलकाची दुरवस्था
हिंगोली : जिल्ह्यातील वळणाच्या ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यात आले. परंतु, अनेक ठिकाणी दिशादर्शक फलकाची दुरवस्था झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या बाबीकडे लक्ष देवून दिशादर्शक फलक नव्याने बसवावे, अशी मागणी होत आहे.
विवेकानंदनगरचा रस्ता उखडला
हिंगोली : शहरातील विवेकानंदनगर ते अकोला बायपास रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. खड्ड्यांमुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे. नगर परिषदेच्या संबंधित विभागाने याची दखल घेवून रस्त्यावरील खड्डे बुजवून वाहनचालकांची गैरसोय दूर करावी अशी मागणी होत आहे.
विरुद्ध दिशेने वाहतूक सुरू
हिंगोली : शहरातील नांदेड नाका ते गांधी चौकदरम्यान विरुद्ध दिशेने वाहतूक सुरूच आहे. यामुळे वाहतुकीस अडथळा होत आहे. शहर वाहतूक शाखेने या बाबीची दखल घेवून विरुद्ध दिशेने होणारी वाहतूक बंद करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
बसस्थानकातील गिट्टी उखडली
हिंगोली : शहरातील नव्या बसस्थानकाचे काम मागील काही महिन्यांपासून रखडले आहे. तात्पुरत्या स्वरूपात प्रवाशांना बसण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. मात्र, बसस्थानकातील गिट्टी उखडल्याने प्रवाशांना बसपर्यंत जाण्यास त्रास होत आहे. आगारप्रमुखांनी याची दखल घेवून प्रवाशांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
वीज खंडित, शेतकरी त्रस्त
शिरड शहापूर : औंढा नागनाथ तालुक्यातील शिरड शहापूर व परिसरात मागील १५ दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरूच आहे. यावर्षी पावसाचे प्रमाण चांगले राहिल्याने विहिरींना पाणी भरपूर प्रमाणात आहे. परंतु, वीज खंडित होत असल्यामुळे पिकांना पाणी देता येत नाही. परिणामी पिके वाळून जात आहेत. महावितरण कंपनीने याची दखल घेवून वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
कुरुंदा येथील मुख्य रस्त्यांची दुरवस्था
कुरुंदा : वसमत तालुक्यातील कुरुंदा येथील एक किलोमीटर अंतराचा मुख्य रस्ता मागील दोन महिन्यांपासून खड्डेमय झाला आहे. त्यामुळे या रस्त्यावरुन ये - जा करताना वाहनचालक तसेच पादचाऱ्यांनाही अनेक समस्यांना सामाेरे जावे लागत आहे. ग्रामपंचायतने या बाबीची दखल घेवून मुख्य रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजवावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी
आखाडा बाळापूर : कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर बसस्थानकासह परिसरात गुटख्याच्या पुड्या, पाणीपाऊच तसेच केरकचरा साचलेला दिसत आहे. यामुळे प्रवाशांना त्रास होत आहे. कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर हे मोठे बाजारपेठेचे गाव असल्यामुळे या ठिकाणी स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे. परंतु, याकडे लक्ष देण्यास कोणीही तयार नाही. बसस्थानक प्रशासनाने याची दखल घेवून परिसरात स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
गावात पाण्यासाठी गावकऱ्यांची भटकंती
बासंबा : हिंगोली तालुक्यातील बासंबा गावातील बोअर, विहिरी आटू लागले आहेत. यामुळे गावात पाणीटंचाई निर्माण होत आहे. गावकऱ्यांची ऐन हिवाळ्यातच पाण्यासाठी भटकंती होत आहे. गावात पाणी मिळत नसल्याने गावकरी शेतशिवारातील बोअर व विहिरीतून पाणी आणत आहेत.
रस्त्यावर धूळ
बासंबा : हिंगोली तालुक्यातील बासंबा - बासंबा फाटा रस्ता उखडला आहे. त्यामुळे या रस्त्याची मागील अनेक महिन्यांपासून दुरवस्था झालेली आहे. रस्ता उखडल्यामुळे या रस्त्यावर नेहमी धूळ राहत असून याचा त्रास या मार्गावरील वाहनधारकांसह प्रवाशांना होत आहे.
कर्णकर्कश वाहनांचा त्रास वाढला
हिंगोली : शहरातील गांधी चौक, अग्रसेन चौक, नांदेड नाका, जवाहर रोड या ठिकाणी शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांची नेहमी वर्दळ सुरू असते, पण या मार्गावरून अनेक कर्णकर्कश आवाज करणारे वाहने धावत असल्याने या सर्व नागरिकांना मोठा त्रास होत आहे. अनेक वाहनचालक विनाकारण आपल्या वाहनांचा आवाज करून नागरिकांना हैराण करीत असल्याचे चित्र आहे.
नाल्याचे पाणी रस्त्यावर साचले
घोटा देवी : हिंगोली तालुक्यातील घोटादेवी गावातील नाल्या तुंबल्यामुळे नालीतील घाण पाणी रस्त्यावर जमा होत आहे. सकाळी सकाळी गावकऱ्यांसह या रस्त्यावरून ये - जा करताना मोठा त्रास होत आहे. तसेच रस्त्यावर घाण पाण्यामुळे दुर्गंधी पसरत असून याचा परिणाम परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. त्यामुळे नाल्या साफ करण्याची मागणी होत आहे.
वानरांमुळे वाहनांचे मोठे नुकसान
हिंगोली : शहरातील जवाहर रोड व इंडिया बँकेकडे जाणाऱ्या रस्त्यावर वानरांनी मोठा उपद्रव मांडला आहे. याठिकाणी उभे केलेल्या वाहनांवर वानरे उड्या मारीत आहेत. यात वाहने खाली पडून मोठे नुकसान होत आहे. तसेच अनेक पादचाऱ्यांच्या अंगावर वानरे धावत जात असून नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. यासाठी वानरांच्या बंदोबस्ताची मागणी नागरिकांतून होत आहे.
बससेवा सुरू करण्याची मागणी
पांगरा शिंदे : वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे गावासह पोतरा, सिंदगी, बोल्डा, वाई व परिसरात धावणारी कळमनुरी आगाराची बससेवा बंद करण्यात आली आहे. यामुळे परिसरातील सर्व प्रवाशांची मोठी गैरसोेय होत आहे. गावातील ही बससेवा सुरू करावी, अशी मागणी गावासह परिसरातील सर्व गावकरी करीत आहेत.
गावातील रस्त्यावर उकीरडे वाढले
रामेश्वर तांडा : कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा येथील अनेक रस्त्यांवर नागरिक कचरा टाकत आहेत. त्यामुळे या रस्त्यांवर उकीरडे निर्माण झाले आहेत. या उकिरड्याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत असल्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. हे उकीरडे साफ करण्याची मागणी होत आहे.