वसमतमध्ये भर रस्त्यात तरुणाचा खून करून आरोपी फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2021 17:39 IST2021-03-12T17:37:27+5:302021-03-12T17:39:03+5:30
वसमत येथील कारखाना रोडवरील लेबर कॉलनी परिसरातील रहिवाशी काशिनाथ लिंगप्पा बावगे वय २६ हा गुरुवारी रात्री रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला.

वसमतमध्ये भर रस्त्यात तरुणाचा खून करून आरोपी फरार
वसमत : येथील कारखाना रोडवर अज्ञात आरोपींनी धारदार शस्त्राने एका २६ वर्षीय युवकावर वार करून त्यांचा खून केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली आहे. हा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या घटनेने वसमत शहरात खळबळ उडाली आहे. भर रस्त्यावर खून करणारे आरोपी दुचाकीवरून फरार झाले आहेत.
वसमत येथील कारखाना रोडवरील लेबर कॉलनी परिसरातील रहिवाशी काशिनाथ लिंगप्पा बावगे वय २६ हा गुरुवारी रात्री रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. ही माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी गुरमे व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोटात तीक्ष्ण हत्याराने वार केल्याचे दिसत होते. पोलिसांनी पंचनामा करून तपास सुरू केला. या भागातील एका खाजगी सीसीटिव्हीचे फुटेज तपासले असता यात हा थरार चित्रित झाला आहे. दुचाकीवर दोघेजण आले होते. त्यातील मागचा उतरून त्याने शस्त्राने वार केला. तेथून दुचाकीवर स्वार हाेत फरार झाल्याचे दिसत आहेत. पोलीस त्या आरोपीचा शोध घेत आहेत. विनाक्रमांकाची दुचाकी असल्याचे समोर येत आहे.
भर रस्त्यावर फिल्मी स्टाईल खून करून फरार होण्याच्या या घटनेने शहरात दहशतीचे वातावरण आहे. खून होण्यामागचे कारण अद्याप समोर आले नाही. आता आरोपी शोधण्यात पोलिसांना यश आले तर या खून प्रकरणाचे कोडे सुटणार आहे. विना क्रमांकाच्या दुचाकी घेऊन शहरात धुडघूस घालण्याचे प्रकार वसमतमध्ये वाढले आहेत. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या टोळ्या दिवसेदिवस वाढत आहेत. गुन्हा दाखल करण्यासाठी कोणी आले तर गुन्हेगाराचा पक्ष घेणारे पाठीराखे लगेच मागे येऊन प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करतात. त्यातून गुन्हेगारांची हिम्मत वाढत आहे. पोलिसांनी अशा गुंडगिरी आणि त्यांच्या पाठीराख्यावर कडक कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी वसीम हाश्मी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक शिवाजी गुरमे आदींनी भेट दिली आहे. याप्रकरणी मयताच्या नातेवाईकाच्या तक्रारीवरून शुक्रवारी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती.