मराठा आरक्षणासाठी पदवीधर तरूणाने संपवले जीवन
By रमेश वाबळे | Updated: December 9, 2023 14:26 IST2023-12-09T14:26:06+5:302023-12-09T14:26:31+5:30
हिंगोली तालुक्यातील खंडाळा येथील घटना; आंब्याच्या झाडाला घेतला गळफास

मराठा आरक्षणासाठी पदवीधर तरूणाने संपवले जीवन
हिंगोली : तालुक्यातील खंडाळा येथे एका २६ वर्षीय पदवीरधर तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ९ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. विठ्ठल दत्तराव गायकवाड (वय २६, रा.खंडाळा ता.जि.हिंगोली) असे मयताचे नाव आहे. दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण नसल्यामुळे पदवीधर होवूनही नोकरी मिळत नाही, बेरोजगारीचा सामना करावा लागत असल्याची खंत विठ्ठल बोलून दाखवित असे, असे मयताच्या नातेवाईकांनी सांगितले.
खंडाळा येथील विठ्ठल दत्तराव गायकवाड याचे शिक्षण बी.एसस्सी झाले होते. परंतु, अनेकवेळा प्रयत्न करूनही नोकरी लागत नव्हती. तसेच हाताला कामही मिळत नाही. त्यामुळे विठ्ठल गायकवाड मागील काही दिवसांपासून नैराश्यात होता. यातच त्याने स्वत:च्या शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सकाळी ८ च्या सुमारास उघडकीस आली. त्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली होती. घटनेची माहिती मिळाल्यानंतर हिंगोली ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. सकाळी ११ च्या समारास मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रूग्णालयात आणण्यात आला होता. याप्रकरणी पोलिस ठाण्यात नोंद घेण्याची प्रक्रिया सुरू होती.