अज्ञाताने लावली आग ; पाच एकरातील सोयाबीनची गंजी जळून खाक
By रमेश वाबळे | Updated: October 13, 2023 16:22 IST2023-10-13T16:21:25+5:302023-10-13T16:22:34+5:30
लाख शिवारातील घटना, शेतकऱ्याचे तीन लाखांवर नुकसान

अज्ञाताने लावली आग ; पाच एकरातील सोयाबीनची गंजी जळून खाक
हिंगोली : कापून ठेवलेल्या सोयाबीनच्या गंजीला आग लागल्याची घटना औंढा नागनाथ तालुक्यातील लाख शिवारात १३ ऑक्टोबर रोजी पहाटे ५ च्या सुमारास उघडकीस आली. या घटनेत ५ एकरातील सोयाबीन जळून खाक झाले असून, शेतकरी सुरज लोंढे यांचे सुमारे तीन लाखांवर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
लाख येथील शेतकरी सुरज कैलासराव लोंढे यांनी गट क्रमांक ३५६ व ३५७ मधील ५ एकर ४ गुंठ्यात सोयाबीनची पेरणी केली होती. चार दिवसांपूर्वी त्यांनी सोयाबीनची कापणी करून शेतात गंजी घातली होती. या सोयाबीनच्या गंजीला आग लावल्याची घटना १३ ऑक्टोबरच्या पहाटे ५ च्या सुमारास उघडकीस आली. त्यानंतर सुरज लोंढे यांच्यासह शेतकऱ्यांनी शेतात धाव घेतली. तोपर्यंत मात्र जवळपास पूर्ण गंजी जळून खाक झाली होती. सोयाबीन पिकाला जवळपास ६० ते ७० हजार लागवड खर्च आला होता. सुमारे ५० क्विंटल सोयाबीन झाले असते, असे शेतकरी सुरज लोंढे यांनी सांगितले. घटनेची माहिती महसूल विभाग, बासंबा पोलिस ठाण्यात देण्यात आली. घटनेचा पंचनामा करण्यात आला असून, याप्रकरणी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.
दरम्यान, हातातोंडाशी आलेला घास हिरावल्या गेल्याने शेतकरी सुरज लोंढे अडचणीत सापडले असून, त्यांना प्रशासनाने तत्काळ मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.