हिंगोली : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे व अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. त्यानुसार दि. ३ फेब्रुवारी रोजी जिल्हाभरात २३१ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. तसेच त्यांच्याकडून ९१ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. या कारवाईमुळे वाहनचालकांचे धाबे दणाणले आहेत.
किरकोळ कारणावरून मारहाण
हिंगोली : दुचाकी रस्त्यात का लावली या करणावरून एकास मारहाण केल्र्याची घटना वसमत तालुक्यातील गुंडा येथे दि. २ फेब्रुवारी रोजी सकाळी ८.३०च्या सुमारास घडली. याप्रकरणी हट्टा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. तपास हट्टा पोलीस करीत आहेत.
दुभाजकाला रिफ्लेक्टर बसवावेत
हिंगोली : हिंगोली ते नांदेड मार्गावर काही ठिकाणी गतिरोधक टाकण्यात आले आहेत. काही गतीरोधकांना पांढरा रंग देण्यात आला आहे. मात्र काही गतिरोधक जवळ जाईपर्यंतही दिसत नसल्याचे पहावयास मिळत आहे. त्यामुळे वाहने आदळून दुखापत होण्याची शक्यता निर्माण होत आहे. याकडे लक्ष देऊन गतिरोधकांना पांढरे पट्टे ओढावेत, अशी मागणी वाहनचालकांतून केली जात आहे.
खड्डे बुजविण्यास सुरुवात
हिंगोली : हिंगोली ते नांदेड मार्गावर उमरा, मसोड फाटा, कळमनुरी शहर आदी ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांतून संताप व्यक्त केला जात होता. अनेकांना या खड्ड्यांमुळे अपघाताला सामोरे जावे लागले. यासंदर्भांत ओरड होताच या मार्गावरील खड्डे बुजविण्यास सुरुवात झाली. उमरा, कळमनुरी, मसोड फाटा आदी भागातील खड्डे बुजविण्यात आले असून, हे काम अजूनही सुरू असल्याचे दिसून येत आहे. उर्वरित खड्डेही बुजवावेत, अशी मागणी वाहनचालक करीत आहेत.
बँकेत लाभार्थींची गर्दी
हिंगोली : शहरातील परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लाभार्थी पैसे उचलण्यासाठी येत आहेत. पैसे उचलणाऱ्या लाभार्थींची संख्या अधिक असल्याने बँकेत गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे. दररोज एक याप्रमाणे एका गावातील लाभार्थींना बँकेत बोलावून लाभार्थींना पैसे वाटप करावेत, अशी मागणी होत आहे.
सिग्नल सुरू करण्याची मागणी
हिंगोली : शहरातील बसस्थानक, महात्मा गांधी पुतळा चौक आदी भागांत नागरिकांची गर्दी असते. तसेच हे मुख्य बाजारपेठ असल्याने वाहनांचीही वर्दळ असते. यामुळे अनेकवेळा या भागातील वाहतूक विस्कळीत होत असते. त्यामुळे या भागातील वाहतुकीला शिस्त लागावी, यासाठी या भागातील सिग्नल सुरू करावेत, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.
गतिरोधक बसविण्याची गरज
हिंगोली : शहरातील जुनी जिल्हा परिषद इमारत ते नवीन जिल्हा परिषद इमारत तसेच बसस्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरून वाहने मोठ्या प्रमाणात धावतात. याच मार्गावरून विद्यार्थ्यांची वर्दळ असते. सिमेंटचा नवीन बसलेल्या रस्त्यावर गतिरोधक बसविण्यात आले नाहीत. त्यामुळे वाहनचालक जोरात वाहने चालवित आहेत. त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण होत आहे. या रस्त्यावर गतिरोधक बसवावेत, अशी मागणी होत आहे.
स्वच्छता अभियान राबविण्याची
गरजहिंगोली : तालुक्यातील अनेक गावात स्वच्छ भारत अभियान राबविण्यात आले होते. यातून काही गावांनी पुरस्कारही मिळविला आहे. मात्र पुरस्कार मिळाल्यानंतर या गावांत स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पुन्हा स्वच्छता अभियान राबविण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.