८३ टक्के पोलिसांनी घेतली लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:29 IST2021-03-18T04:29:21+5:302021-03-18T04:29:21+5:30
१४ अधिकारी, १०० पोलीस कर्मचाऱ्यांनी घेतला दुसरा डोस ----- हिंगोली : जिल्हाभरात कोरोना लसीकरण मोहीम सुरू आहे. लस घेण्यात ...

८३ टक्के पोलिसांनी घेतली लस
१४ अधिकारी, १०० पोलीस कर्मचाऱ्यांनी घेतला दुसरा डोस
-----
हिंगोली : जिल्हाभरात कोरोना लसीकरण मोहीम सुरू आहे. लस घेण्यात पोलीस अधिकारी, कर्मचारीही आघाडीवर असून, आतापर्यंत ८३.९३ टक्के पोलिसांनी कोरोनाची लस घेतली असल्याची माहिती हिंगोली जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांनी दिली.
राज्यासह जिल्हाभरात कोरोना संसर्गजन्य आजाराने धुमाकूळ घातला आहे. हा आजार सर्वसामान्यांना होऊ नये, यासाठी मागील वर्षभरापासून आरोग्य विभाग, स्वच्छता विभागासह पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचारी जिवाची पर्वा न करता रात्रंदिवस काम करीत आहेत. यातील काही अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोना आजाराचा सामना करावा लागला. या आजारापासून बचाव व्हावा, यासाठी काही दिवसांपूर्वी लस उपलब्ध झाली आहे. त्यानुसार कोरोनायोद्धा असलेल्या आरोग्य, पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांना प्राधान्य देत कोरोना लसीकरणास सुरुवात करण्यात आली. जिल्ह्यात ६८ अधिकारी तसेच १ हजार ७७ पोलीस कर्मचारी संख्या आहे. आतापर्यंत ६१ अधिकारी व ९०० पोलीस कर्मचाऱ्यांनी कोरोना लस घेतली आहे. कोरोना लस घेण्यासंदर्भात नागरिकांत संभ्रम असताना, पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांनी मात्र पुढाकार घेत कोरोना लसीचा डोस घेतला आहे.
१० टक्के पोलिसांनी घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस
-----
कोरोना लसीकरणास पोलीस अधिकारी, कर्मचारी पुढाकार घेत आहेत. लसीचा पहिला डोस ८३.३३ टक्के पोलिसांनी घेतला. त्यानंतर ९.९५ टक्के पोलिसांनी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला आहे. यात १४ अधिकारी, तर १०० पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
लसीकरणासाठी महिला पोलीसही अग्रेसर
----
1) जिल्ह्यातील बहुतांश महिला पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कोरोना लसीकरणास प्रतिसाद दिला आहे. कोरोनाचा लसीचा दुसरा डोसही घेण्यासाठी पुढाकार घेत आहेत.
2) केवळ काही आजारी असलेल्या तसेच प्रसूती रजा घेतलेल्या महिला पोलिसांचे कोरोना लसीकरण राहिल्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांनी सांगितले.
जिल्ह्यातील एकूण पोलीस-१०७७
लस घेतलेले पोलीस-९००
जिल्ह्यात एकूण पोलीस अधिकारी-६८
लस घेतलेले पोलीस अधिकारी-६१