जीपमधील प्रवास पडला महागात; महिलेचे ७ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2022 17:36 IST2022-02-10T17:35:14+5:302022-02-10T17:36:15+5:30
वसमत - शिरड शहापूर असा प्रवास करत असताना झाली चोरी

जीपमधील प्रवास पडला महागात; महिलेचे ७ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास
कुरुंदा ( हिंगोली ) : वसमत येथून प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीपमध्ये वसमत - शिरड शहापूर दरम्यान प्रवास करताना, महिलेचे पर्समधील साेन्याचे दागिने (अंदाजे किंमत ७ लाख) चोरीला गेले असल्याची घटना ४ फेब्रुवारी राेजी रात्री ८.४२ वाजेच्या दरम्यान घडली आहे. याप्रकरणी कुरुंदा पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
वसमत येथून प्रवासी वाहतूक करणारी जीप क्रमांक एमएच २३, ई ४५५१ मधून फिर्यादी महिला ४ फेब्रुवारी रोजी रात्री ८.४२ वाजेच्या दरम्यान वसमत - शिरड शहापूर असा प्रवास करीत होती. यावेळी अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी महिलेच्या पर्समधून २४ ताेळ्यांचे साेन्याचे दागिने किंमत ७ लाख ५ हजार लंपास केले आहेत.
याप्रकरणी ५ दिवसांनंतर कुरुंदा पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी महिला ऊर्मिला विकास यंबल यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपीनवार, पोलीस नायक बालाजी जोगदंड, एस. के. बुट्टे करीत आहेत.